esakal | कोकिसरेत दिवसा ढवळ्या घरात घुसून चोरी
sakal

बोलून बातमी शोधा

कोकिसरेत दिवसा ढवळ्या घरात घुसून चोरी

वैभववाडी - कोकिसरे बांधवाडी येथील आनंदी दत्ताराम नारकर (वय ७५) या महिलेच्या घरात घुसून तिच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे दागिने हिसकावून अज्ञात चोरट्याने पलायन केले. हा प्रकार मंगळवारी (ता. १६) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. भरदिवसा ही चोरी झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक वैभववाडीत दाखल झाले आहे.

कोकिसरेत दिवसा ढवळ्या घरात घुसून चोरी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वैभववाडी - कोकिसरे बांधवाडी येथील आनंदी दत्ताराम नारकर (वय ७५) या महिलेच्या घरात घुसून तिच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे दागिने हिसकावून अज्ञात चोरट्याने पलायन केले. हा प्रकार मंगळवारी (ता. १६) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. भरदिवसा ही चोरी झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक वैभववाडीत दाखल झाले आहे.

कोकिसरे बांधवाडी येथे आनंदी नारकर आणि दत्ताराम गंगाराम नारकर हे वृद्ध दाम्पत्य राहतात. आज दुपारी जेवण आटोपून हे दाम्पत्य विश्रांती घेत होते. अडीच वाजण्याच्या सुमारास हेल्मेट घातलेली एक अज्ञात व्यक्ती घरात आली. त्याने वृद्ध महिलेला काही कळायच्या आत तिच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे एक आणि अर्धा तोळ्याचे एक अशी दोन्ही मंगळसूत्रे हिसकावून घेतली आणि दुचाकीवरून पलायन केले. नारकर दाम्पत्याने आरडाओरडा केला; परंतु आजूबाजूचे लोक येण्यापूर्वी अज्ञात 
चोरट्याने धूम ठोकली होती.

या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय बाकारे, बी. बी. चौगुले, राजेंद्र खेडकर आदी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळांची पाहणी केली. दरम्यान, सौ. नारकर यांनी पोलिसांत चोरीची फिर्याद दिली आहे. या प्रकाराची माहिती मिळताच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक वैभववाडीत दाखल झाले. त्यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली. अज्ञात चोरटा नेमका कोणत्या दिशेने गेला, याची माहिती पोलिसांना मिळालेली नाही.

हेल्मेट घालून चोरी
अज्ञात चोरट्याने नारकर दाम्पत्यांच्या घराबाहेर दुचाकी उभी केली. दुचाकी उतरून हेल्मेटसह तो नारकर यांच्या घरात घुसला. ज्यावेळी वृद्धेच्या गळ्यातील दागिने त्यांनी हिसकावून घेतले, त्यावेळी त्यांच्या डोक्‍यावर हेल्मेट होते.

पोलिस व्यस्त असल्याचा गैरफायदा
पोलिस सध्या लोकसभा निवडणुकीमुळे व्यस्त आहेत. राजकीय पक्षांच्या होणाऱ्या प्रचार सभा, निवडणूक प्रचारावर लक्ष, अशा अनेक कामांत पोलिस गर्क आहेत. त्याच संधीचा फायदा घेत चोरट्याने नारकरवाडीतील महिलेच्या गळ्यातील दागिने चोरले, तर नाधवडे येथील शाळा फोडून टीव्ही चोरली.

तळेरेतही महिलेचे मंगळसूत्र लंपास
वीज बिल आणि वीज रीडिंग बघण्याच्या निमित्ताने तळेरे वाघाचीवाडी येथील सौ. अक्षता चव्हाण यांच्या घरात घुसून अज्ञात चोरट्याने गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. पाणी मागण्याचे कारण देत या चोरट्याने घरात प्रवेश केला. ही घटना आज दुपारी ३ च्या सुमारास घडली; मात्र याची नोंद झालेली नाही.

loading image