बंद बंगला फोडून केले रोख रकमेसह साडेचार लाखाचे दागिने लंपास

राजेंद्र बाईत
Thursday, 21 January 2021

माहीतगार व्यक्तीने रेकी करून चोरी केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

राजापूर (रत्नागिरी) : येथील पै. अकबर ठाकूर यांचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे सुमारे चार लाख ५४ हजारांचे दागिने व २० हजार रुपयांची रोख रक्कम लांबविल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. बाजारपेठेतील भरवस्तीमध्ये झालेल्या या धाडसी चोरीने शहरात खळबळ माजली आहे. माहीतगार व्यक्तीने रेकी करून चोरी केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपासाची सूत्रे वेगाने फिरली असून चोरीचा छडा लावण्यासाठी सायंकाळी उशिरा श्‍वानपथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्यासोबत ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. अकबर ठाकूर यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन्ही कन्या चोरी झालेल्या घरामध्ये राहतात. मात्र, त्या काही वेळा लगतच राहणारे त्यांचे बंधू अशफाक यांच्या निवासस्थानी वास्तव्यास असतात. सोमवारी (ता.२०) दुपारी कु. खुर्शीद व त्यांची बहीण आपले घर बंद करून अशफाक यांच्याकडे राहण्यासाठी गेल्या.

हेही वाचा - शेती क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटावी म्हणून अक्षय शेतात नव-नवे प्रयोग करत आहे 

 

काल सकाळी ११ वा. च्या दरम्यान खुर्शीद या आपल्या घरी आल्या असताना त्यांना घराच्या पुढील दरवाजाची कडी वाकलेली दिसली. त्यांनी निरखून पाहिले असता दरवाजाची कडी तोडलेली दिसत होती. त्यांनी तत्काळ शहनवाज ठाकूर यांना माहिती दिली. त्यांनी राजापूर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली.
पोलिस निरीक्षक परबकर यांसह पोलिस हेडकॉस्टेबल जाधव, प्रमोद वाघाटे, सागर कोरे हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी खुर्शीद अकबर ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष वालावलकर करीत आहेत.

थेट घटनास्थळावरून...

  • चोरट्यांनी घरात तळमजल्यावरील व वरच्या मजल्यावरील दोन लाकडी कपाटे फोडली
  • कपाटातील सोन्याचांदीचे सुमारे चार लाख ५४ हजारांचे दागिने व रोख २० हजार रुपयांची रक्कम लांबविली
  • कपाटातील सर्व साहित्य चोरट्यांनी अस्ताव्यस्त पसरल्याचे घटनास्थळी दिसून आले
  • घराचे मागचे दारदेखील उघडे होते. यावरून चोरट्यांनी घराच्या मागच्या दाराने पोबारा केल्याचा अंदाज

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robbery in rajapur ratnagiri gold jewellery theft form closed home rupees 4 lakh