Loksabha 2019 : एकमेकांविरोधी आग ओकणारे तिघे एकत्र

Loksabha 2019 : एकमेकांविरोधी आग ओकणारे तिघे एकत्र

देवरूख - तीन वेगळ्या पक्षांतून दोन वर्षांपूर्वी तिघे जिल्हा परिषदेसाठी एकमेकांच्या विरोधात लढले. अवघ्या दोनच वर्षांत नियतीने आपली खेळी केली आणि एकमेकांच्या विरोधात लढलेले ते तिघे युतीच्या मार्गावर एकाच उद्देशाने एकाच व्यासपीठावर आले. 

शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य रोहन सुभाष बने, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव आणि सेनेच्या महिला नेत्या नेहा रवींद्र माने यांची ही अवस्था आहे. शिवसेनेने संगमेश्‍वर तालुक्‍याला रवींद्र माने आणि सुभाष बने असे दोन तरुण नेतृत्व दिले. त्यांच्यापाठोपाठच मानेंची पत्नी नेहा आणि बनेंचे पुत्र रोहन हे तालुक्‍याच्या राजकारणात उतरले.

प्रमोद अधटराव हे सुद्धा शिवसैनिकच. सुरवातीला ते रवींद्र मानेंच्या मुशीत शिकले. नंतर सुभाष बनेंचे सहकारी झाले. २००६ ला शिवसेनेतील भूकंपानंतर बने काँग्रेसवासी झाले. त्यांच्यासोबत पुत्र रोहन आणि सहकारी प्रमोद अधटराव काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर रोहन सक्रिय राजकारणात नव्हते; मात्र अधटराव पंचायत समितीचे सदस्य झाले.

२०१० ला रवींद्र माने सेनेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादीत गेले. त्यांच्यासोबत अर्धांगीनी नेहा यादेखील राष्ट्रवादीत गेल्या. तिथे जिल्हा बॅंक संचालक आणि नंतर जिल्हा परिषद सदस्य झाल्या. 

२०१४ ला बने सेनेत परतले. त्यांच्यासोबत रोहन आणि अधटरावसुद्धा सेनेत आले. तरीही रोहन सक्रिय राजकारणात नव्हते; मात्र अधटराव पंचायत समितीचे उपसभापती झाले. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती आहे. परिणामी, माने-बनेंसोबतच अधटरावही युतीच्या व्यासपीठावर दिसत आहेत. दोन वर्षांपूर्वी एकमेकांच्या विरोधात तीन वेगवेगळ्या पक्षांतून लढलेले तिघेही आज युतीच्या मार्गावर एकत्र आले आहेत. राजकारणात अशक्‍य काहीच नाही हेच यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

अधटराव हरले तरीही तालुकाध्यक्ष
२०१७ ला जिल्हा परिषद निवडणूक लागली. विद्यमान सदस्य म्हणून राष्ट्रवादीकडून नेहा माने रिंगणात होत्या. सेनेकडून एकमत न झाल्याने अधटराव भाजपमध्ये गेले. त्याच पक्षातून ते रिंगणात राहिले, तर रोहन सुभाष बने सेनेचे उमेदवार होते. या लढतीत बने जिंकले, तर माने, अधटराव पराभूत झाले; मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. मध्यंतरीच्या कालखंडात रवींद्र माने सेनेत परतले. त्यांच्यासह नेहा मानेही सेनेत आल्या. अधटराव हरले तरीही भाजप तालुकाध्यक्ष झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com