
सकाळी धावायला निघाल्यानंतर सकाळची ताजी हवा, थंडावा, आजूबाजूचा निसर्ग, सूर्याची कोवळी किरणे यामुळे शरीराला आणि मनाला एक नैसर्गिक ऊर्जा प्राप्त होते आणि आपला पुढील संपूर्ण दिवस हा ताजातवाना जातो. तसेच शरीर थकल्यामुळे रात्री झोप लवकर येते व ती झोप गाढही लागते. धावण्याच्या जोडीला जर योग्य आहाराची जोड दिली तर चाळीशीनंतरही आपले शरीर सडपातळ आणि बांधा सुडौल नक्की होऊ शकतो; परंतु यासाठी घाई न करता संयम ठेवावा लागतो. शरीरात पूर्णपणे बदल होण्यासाठी २ ते ३ वर्षांचा कालावधी लागू शकतो. या दरम्यान धावण्यामध्ये सातत्य राखणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.
डॉ. तेजानंद गणपत्ये, एम. डी. पॅथोलॉजी