मिऱ्यातील `त्या` जहाजासंदर्भात सागरी सीमा मंचने केलीय `ही` मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

सागरी सीमा मंचाचे कोकण प्रांतप्रमुख संतोष पावरी, दक्षिण रत्नागिरी जिल्हा संयोजक स्वप्नील सावंत, रत्नागिरी तालुकाप्रमुख अतुल भुते, ग्राम समितीप्रमुख तनया शिवलकर यांनी निवेदन दिले. 

रत्नागिरी - मिऱ्या बंधाऱ्यात अडकलेले जहाज हलवण्याची कार्यवाही संथगतीने होत आहे. 25 दिवस होऊनही जहाज हलवले नाहीच व स्थानिक प्रशासन, अधिकारी मिऱ्या ग्रामस्थांच्या जीवाशी खेळत आहेत. किनारपट्टीच्या सुरक्षिततेविषयी उदासीन आहे. निविदा न मागवता ऑईल काढले जात असून, जहाज स्क्रॅप करायचे असल्यास स्थानिक ग्रामस्थांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी सागरी सीमा मंचाने केली आहे. 

आज यासंदर्भात पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व निवासी जिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांना निवेदन दिले. पोलिस अधीक्षकांनी दखल घेत जहाज परिसराला भेट दिली.

सागरी सीमा मंचाचे कोकण प्रांतप्रमुख संतोष पावरी, दक्षिण रत्नागिरी जिल्हा संयोजक स्वप्नील सावंत, रत्नागिरी तालुकाप्रमुख अतुल भुते, ग्राम समितीप्रमुख तनया शिवलकर यांनी निवेदन दिले. 
मिऱ्या बंधाऱ्याच्या नुकसानीची व स्थानिकांना होणाऱ्या त्रासाची नुकसानभरपाई जहाज मालकाकडून मिळावी. जळके ऑईल काढण्यासाठी किती दिवस जातील, हे माहिती नाही. इंधन काढल्यानंतर त्याची दुर्गंधी पसरून स्थानिकांना त्रास होत आहे.

लोकांना धोका असूनही प्रशासनाने मालकाला शोधून ते जहाज हलवण्यातसंदर्भात काहीच उपाययोजना का केली नाही? आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अस्तित्वात नाही का? असे सवाल सागरी सीमा मंचाने विचारले. भविष्यात अशी दुर्घटना घडल्यास खबरदारीच्या उपाययोजना आखून ठेवाव्यात, असेही सुचवले. 

3 जूनला "निसर्ग' चक्रीवादळात एमटी बसरा स्टार हे इंधनवाहू जहाज भरकटत भाटीमिऱ्या किनाऱ्यावर धडकले. तीन दिवसांनंतर जहाज काढण्यासंदर्भात कोणतीही हालचाल प्रशासनाकडून झाली नाही. 6 जूनला ग्रामस्थ व सागरी सीमा मंचाने प्रादेशिक बंदर अधिकारी शंकर महानवर यांना निवेदन दिले. नंतर डी. जी. शिपिंगचे अधिकारी रत्नागिरीत आले, पण आठवड्यानंतरही काही हालचाल झाली नाही. नंतर जळके ऑईल काढण्यास सुरवात झाली. 

तेल काढण्याचे काम बाहेरच्यांना 
तेल काढण्याचे कंत्राट कोणाला व कशा पद्धतीने दिले. त्याची निविदा प्रक्रिया राबवली का? लॉकडाउनमुळे स्थानिक ग्रामस्थांना काम नव्हते. त्यांना हे काम देता आले असते, परंतु बाहेरील व्यक्तींना हे काम दिले, हे ऐकून ग्रामस्थ संतापले आहेत. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sagari Sima Manch Demand About Ship In Mirya Beach Ratnagiri Marathi News