
त्यांचे नेतृत्व स्वीकारायला आम्ही तयार आहोत, अशा शब्दात बाळ माने यांना शिवसेनेत येण्याचे खुले निमंत्रण उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले.
रत्नागिरी : भाजपचे माजी आमदार बाळ माने सुसंस्कृत नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी कधी मारामारी केली नाही. अनेकदा मी त्यांचा सल्ला ऐकला आहे; मात्र पक्षात सध्या त्यांचा निवडणुकीपुरता वापर केला जात आहे. त्यांची घुसमट आम्ही समजू शकतो. त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत यावे, पक्षाची संपूर्ण ताकद त्यांच्यामागे उभी करू. त्यांचे नेतृत्व स्वीकारायला आम्ही तयार आहोत, अशा शब्दात बाळ माने यांना शिवसेनेत येण्याचे खुले निमंत्रण उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले.
गोळप येथील प्रचार सभेतील या आवतणाने राजकीय वातावरण ढवळून निघाले. ग्रामपंचायत निवडणुकीवरून या दोघांत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवण्यासाठीची शिवसेना विरुद्ध भाजप अशीच लढत सुरू आहे. मात्र, या सर्व राजकीय घडामोडीमध्ये भाजपचे माजी आमदार बाळ माने पुन्हा प्रवाहात आले. तेव्हा त्यांनी ‘मंत्री सामंत आणि पालकमंत्री यांच्या विरोधात ग्रामीण भागात प्रचंड नाराजी आहे. त्या नाराजांच्या मागे मी उभा राहणार आहे. जुने-नवे वाद उफाळल्याने त्याचा फायदा भाजपला नक्की ग्रामपंचायत निवडणुकीत मिळेल,’ असे सांगितले.
हेही वाचा - सिंधुुदुर्गातही होणार वन अमृत प्रकल्प -
याला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले, ‘‘बाळ माने माझे चांगले मित्र आहेत. अनेक वेळा मी त्यांचा सल्ला घेतला आहे. तालुक्यात आणि जिल्ह्यात बाळ माने यांना मानणारे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. ते सुद्धा आम्हाला नेहमी सहकार्य करतात. त्यामुळे १८ तारखेला नेमके काय चित्र ते स्पष्ट होईल.’’ त्यात सामंत यांनी बाळ माने यांना थेट सेनेत येण्याचे आवताण दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सामंत म्हणाले, ‘‘बाळ मानेंना बाजूला करण्यासाठी अनेक षड्यंत्र केली जात आहेत. त्यामुळे त्यांची घुसमट आम्ही समजू शकतो. पक्षांतर्गत विरोधकांसोबत राहण्यापेक्षा त्यांनी आमच्यासोबत यावे, संपूर्ण पक्षाची ताकद त्यांच्यामागे उभा करू.’’ सामंत यांनी ऐन ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांच्या पायात साप सोडल्याने राजकीय वातावरणात गंमत आली आहे.
हेही वाचा - रामजन्म अभियानात सहभागी व्हा ः आमदार राणे -
संपादन - स्नेहल कदम