esakal | एसटी सजावटीतून "नारी'शक्तीला सलाम 

बोलून बातमी शोधा

Salute To Women Power From ST Decoration Sindhudurg Marathi News

आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी एसटी बसमध्ये खास विद्युत रोषणाई, गाण्यांची व्यवस्था करणाऱ्या एसटी चालक पाटील यांनी यावर्षी रणरागिणीचे कार्य अधोरेखित करणारी एसटी बसची सजावट केली.

एसटी सजावटीतून "नारी'शक्तीला सलाम 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मालवण ( सिंधुदुर्ग ) - आंगणेवाडीतील भराडी मातेच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी वेगवेगळे सामाजिक संदेश देणारे एसटी चालक संतोष पाटील यांनी यावर्षीला एसटी सजावटीतून "नारी'शक्तीला सलाम केला आहे. महिलांवर होणारे अत्याचाराचे वाढते प्रकार विचारात घेता त्यांनी महिला सक्षमीकरण होण्याच्या दृष्टीने विविध क्षेत्रातील आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविलेल्या महिलांचे प्रेरणादायी "पोस्टर्स' चिकटवून अनोख्या पद्धतीने भारतीय रणरागिणींच्या कार्याला सलाम केला. 

येथील एसटी आगारात संतोष पाटील हे गेली अनेक वर्षे सेवा बजावत आहे. एसटी आपला संसार असून प्रवासी आपले कुटुंबातील सदस्य आहेत. या भावनेतून त्यांनी हजारो प्रवाशांच्या हृदयावर राज्य गाजवले. शैक्षणिक सहल, प्रासंगिक करार तसेच एसटीच्या ज्यादा फेऱ्या असल्या की प्रवाशांना पाटील यांच्या ताफ्यातील एसटीने प्रवास करणे अधिक सुखकर वाटते. एसटी म्हटली की लाल डबा म्हणून नाक मुरडणारे सर्वसाधारण प्रवासी चालक पाटील यांना पाहिल्यावर मात्र त्यांच्या 'लालपरी'त बसण्यासाठी आतुर होतात. 

आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी एसटी बसमध्ये खास विद्युत रोषणाई, गाण्यांची व्यवस्था करणाऱ्या एसटी चालक पाटील यांनी यावर्षी रणरागिणीचे कार्य अधोरेखित करणारी एसटी बसची सजावट केली. पाटील यांना त्यांच्या पत्नीकडून मोलाचे सहकार्य लाभले. चालक पाटील यांनी आगारातील सर्व अधिकारी, चालक, वाहक तसेच कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभल्याचे सांगितले. 

प्रेरणादायी महिलांची छायाचित्रे 

आंगणेवाडी यात्रोत्सवानिमित्त सजविलेल्या एसटी बसच्या दर्शनी भागाला भारतीय नारीची ओळख असलेली प्रतिकात्मक "नथ' लावली होती तर एसटीच्या बाहेरील तीन बाजूंना पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अंतराळवीर कल्पना चावला, पहिल्या महिला पोलिस अधिकारी किरण बेदी, महिला डॉक्‍टर डॉ. आंनदीबाई जोशी, महिला मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, क्रीडा क्षेत्रातील मेरी कोम, मदर तेरेसा, पी. टी. उषा आदी प्रेरणादायी महिलांची छायाचित्रे लावली होती.