पारकरांचे आंदोलन सरकारच्या अपयशाची गाथा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

कणकवली - भाजपचे युवा नेते संदेश पारकर हे वीज, पाणी, आरोग्य आदी प्रश्‍नांबाबत सतत आंदोलने करीत आहेत. त्यांची ही आंदोलने म्हणजे भाजप सरकारच्या अपयशाची गाथा आहे. सिंधुदुर्गचा विकास करण्यात पालकमंत्री आणि मुख्यमंत्री देखील कुचकामी ठरलेत हे यातून स्पष्ट होतंय अशी टीका नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली.

कणकवली - भाजपचे युवा नेते संदेश पारकर हे वीज, पाणी, आरोग्य आदी प्रश्‍नांबाबत सतत आंदोलने करीत आहेत. त्यांची ही आंदोलने म्हणजे भाजप सरकारच्या अपयशाची गाथा आहे. सिंधुदुर्गचा विकास करण्यात पालकमंत्री आणि मुख्यमंत्री देखील कुचकामी ठरलेत हे यातून स्पष्ट होतंय अशी टीका नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली.

येथील आपल्या दालनात नगराध्यक्ष श्री. नलावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासमवेत गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजित मुसळे, माजी नगरसेवक किशोर राणे उपस्थित होते.

श्री. नलावडे म्हणाले, ""गेल्या साडे चार वर्षात राज्यातील भाजप सरकारला विकासाचा एकही प्रश्‍न सोडवता आलेला नाही. सरकारी रूग्णालयात डॉक्‍टर नाहीत. ग्राहकांना वीज जोडण्या मिळत नाहीत. याबाबत स्वाभिमान पक्षाने गेल्या वर्षी आवाज उठवला होता; पण आता विधानसभा निवडणुकांना चार महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिल्यानंतर पारकरांना या प्रश्‍नांवर जाग आली आहे.''

ते म्हणाले, ""राज्य आणि केंद्र सरकार जनतेचा कुठलाच प्रश्‍न सोडवू शकत नाही हे पारकरांच्या आंदोलनांमुळे स्पष्ट झालंय. सत्तेत असूनही ते एकही विकासकाम मार्गी लावू शकले नाहीत. अखेर त्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. सरकार विरोधात करत असलेल्या आंदोलनाबाबत आम्ही शहरवासीयांच्यावतीने त्यांना धन्यवाद देत आहोत; मात्र या आंदोलनांच्या माध्यमातून ते अन्य पक्षाचा पर्याय शोधत असावेत असेही वाटते.''

डॉक्‍टर आणून दाखवा
संदेश पारकर हे सत्तेत आहेत. त्यामुळे त्यांनी फुकाची आंदोलने करू नयेत. तर धमक असेल तर त्यांनी कणकवली उपजिल्हा रूग्णालयात डॉक्‍टर आणून दाखवावेत असे आव्हान नगराध्यक्ष श्री.नलावडे यांनी दिले.

भूमिगत वीज वाहिनीचा निर्णय प्रशासन घेईल
शहरात कुठे भूमिगत वीज वाहिन्या टाकायच्या आहेत त्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासन घेईल. त्यात संदेश पारकर यांनी लुडबूड करू नये. शहराचे निर्णय घेण्यास आम्ही सक्षम आहोत. जनतेने नाकारलेल्यांनी त्यात ढवळाढवळ करू नये असा इशारा देखील श्री.नलावडे यांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sammer Nalavade comment