खेड खाडीपट्टा भागात वाळू माफियांवर कारवाई ; सक्‍शन पंपासह दोन होड्या बुडवल्या

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 November 2020

तहसीलदार घोरपडे यांच्या पथकाने दोन होड्या फोडून पाण्यात बुडवल्या आणि एक सक्‍शन पंप फोडला.

खेड (रत्नागिरी) : खाडीपट्टा विभागात तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी वाळू माफियांवर कारवाई करत बंदी मोडून अनधिकृतरीत्या जगबुडी नदीत सुरू असलेल्या वाळू उपशासाठी वापरात असलेला सक्‍शन पंप फोडून नदीत बुडवला. दोन होड्यांनाही जलसमाधी दिली.

राजवेल, कर्जी, सवणस या ठिकाणी वाळूची वाहतूक करण्यासाठी तयार केलेल्या रस्त्यांवर खड्डे खोदून वाहने जाऊ शकणार नाहीत याची व्यवस्था करण्यात आली. तहसीलदार घोरपडे यांच्या पथकाने दोन होड्या फोडून पाण्यात बुडवल्या आणि एक सक्‍शन पंप फोडला. एक होडी साडेतीन लाखांची तर सक्‍शन पंपाची किंमत पाच लाख रुपये आहे. 

हेही वाचा - सरकारच्या निर्णयामुळे 167 शिक्षकांचे भवितव्य अधांतरी -

खाडीपट्टा विभागात कर्जी, सवणस या विभागात बंदी असतानाही सक्‍शन पंपाद्वारे रात्रंदिवस वाळूचा उपसा केला जातो, अशा तक्रारी होत्या. याबाबत तहसीलदार घोरपडे यांनी त्या विभागातील मंडळ अधिकारी, तलाठी यांना चौकशीचे आदेश दिले. तेथे वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तहसीलदारांसह मंडळ अधिकारी संजय मद्रे, तलाठी भोसले, खेडेकर, क्षीरसागर यांच्यासह इतर गावांतील तलाठी आणि तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांचे पथक आज सकाळी खाडीपट्ट्यात पोहोचले.

सवणस येथील जगबुडी नदीमध्ये असलेला सक्‍शन पंप निदर्शनास आला. त्या ठिकाणी एका होडीने जाऊन अधिकाऱ्यांनी सक्‍शन पंपाची बोट फोडून तो पाण्यामध्ये बुडवला. तसेच राजवेल, कर्जी, सवणस या विभागात वाळूची वाहतूक करण्यासाठी तयार केलेले रस्तेही महसूल विभागाने यंत्राच्या साहाय्याने खोल खोदून वाहने पुन्हा या रस्त्याने जाणार नाहीत, याचा बंदोबस्त केला. 

हेही वाचा - नाणार प्रश्नी मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची भेट घेणार -

वाळू माफियांना भीती नाही 

या धडक कारवाईनंतर काही तासांतच हातपाटीद्वारे पुन्हा उत्खनन सुरू झाल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. कोट्यवधीचा महसूल बुडवून चोरट्या पद्धतीने उत्खनन करून वाळूचा उपसा करणारे वाळू माफिया लाखोंचा फायदा मिळवतात.

खाडी दूषित करीत असल्यामुळे नागरिकांसह एका ज्येष्ठ नेत्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यामुळे तहसीलदारांनी धडक कारवाई केली; परंतु काही तासात वाळूचे उत्खनन सुरू झाल्याने या माफियांना कोणाची भीती वाटत नाही, याचीच चर्चा आहे. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sand mafia mining in ratnagiri with the help of suction pump two boats are immersion in sea