
गुहागर (रत्नागिरी) : भातगाव येथे शासनाच्या नाकावर टिच्चून खुलेआम बेकायदा वाळू व्यवसाय सुरू आहे. परराज्यातील कुशल कामगार, सुमारे ३ ब्रास वाळू क्षमता असलेली बोट आणि दृष्टीआड ठिकाण या बळावर येथील व्यावसायिक दररोज सुमारे ९ ब्रास वाळूचा उपसा करतात.
भातगाव राई पुलानजीक जयगडच्या खाडीत वाळू व्यवसाय तेजीत सुरू आहे. दिवसाढवळ्या ३ ते ४ ब्रास वाळू राहील, अशी क्षमता असलेल्या बोटींची वाहतूक राजरोस पुलाखालून सुरू असते. भातगाव मार्गे रत्नागिरीला जाणाऱ्या रस्त्यावरून सहज कळणार नाही, अशा ठिकाणी एकावेळी दोन ट्रक उभे राहतील, असे ठिकाण या वाळू व्यावसायिकांनी विकसित केले आहे. बोटीतून थेट अन्य वाहनात वाळू टाकण्याची व्यवस्थाही बोटीवर असते. जमिनीवर वाळू साठा केलाच जात नाही. स्वाभाविकपणे शासकीय अधिकाऱ्यांना पुरावा मिळत नाही. अशा पद्धतीने भातगांवात तीन ते चार व्यावसायिक स्वतंत्र व्यवसाय करतात.
अश्या पध्दतीने काढली जाते वाळू
वाळू काढण्यासाठी मोठ्या काठीला सुमारे दीड इंच रुंदीचे लोखंडी कडे बसविलेले असते. कड्याला लांब दोरखंड बांधलेला असतो. या कड्याला बारीक जाळीची मजबूत पिशवी लावली जाते. ही काठी खाडीत टाकून वाळू पिशवीत भरली जाते. त्यानंतर दोरखंडाच्या साह्याने काठी खेचली जाते. साधारणपणे चार तासात ३ ब्रास वाळू काढली जाते. कामगार पोहण्यात तरबेज असतात. अटीतटीचा प्रसंग आला तर वाळूसह बोट बुडवून कामगार पोहून पलायन करतात. त्यामुळे खाडीत प्रत्यक्ष काम करताना सहसा त्यांच्या नादी कोणी लागत नाही.
हेही वाचा-अडीच महिन्यांच्या बाळाला त्याने लादीवर आपटले अन् घेतला तीचा जीव...
पुराव्याची खूणही शिल्लक रहात नाही..
सामान्य माणसालाही वाळू काढण्याची ठिकाणे माहिती असली तरी अपरिचित व्यक्तीला त्या ठिकाणांपर्यंत पोचू दिले जात नाही. तसेच एखाद्या ठिकाणी अपरिचित व्यक्ती आल्याची खबर मिळाली तर अन्य तीन ठिकाणी सुरू असलेले वाळू धंद्याच्या जागांवर पुराव्याची खूणही शिल्लक रहात नाही, अशी यंत्रणा व्यावसायिकांनी तयार केली आहे. यामुळेच भातगाव खाडीपट्टातील बेकायदेशीर वाळू उपसा बिनदिक्कत सुरू असतो. महसूल विभागाला येथे व्यवसाय चालतो, हे माहिती आहे. मात्र, पुराव्याअभावी कारवाई करता येत नसल्याचे
अधिकारी सांगतात.
दृष्टिक्षेपात..
रोज सुमारे ९ ब्रास काढतात
३ ब्रास वाळू क्षमतेची बोट
वाळू बोटीतून थेट वाहनात
वाळूसह बोट बुडवण्याची तयारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.