अडीच महिन्यांच्या बाळाला त्याने लादीवर आपटले अन् घेतला तीचा जीव...

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 15 मार्च 2020

त्याने पाळण्यात झोपलेल्या मधुरा या अडीच महिन्यांच्या बालिकेच्या छातीत ठोशाने मारले. तिचा हात पिरगळला.अन्

लांजा (रत्नागिरी) : अडीच महिन्यांच्या बालिकेला संस्थेतीलच मुलाने लादीवर आपटले. यामुळे तिच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी लांजा महिलाश्रम या संस्थेतील दत्तक ग्रहण केंद्राच्या अधीक्षिका आणि काळजी वाहक अशा दोन महिला कर्मचाऱ्यांवर लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

ही घटना २७ फेब्रुवारी २०२० रोजी घडली होती. कै. जानकीबाई (आक्का) तेंडुलकर महिलाश्रम लांजामध्ये मनोविकृत सहा वर्षांचा मुलगा दिलदूर समशेद हा संस्थेत दाखल केला होता. २७ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता संस्थेच्या दत्तक ग्रहण केंद्राच्या खोलीत मधुरा ही अडीच महिन्यांची बालिका पाळण्यात झोपली होती. यावेळी या ठिकाणी काळजीवाहक म्हणून काम करीत असलेल्या श्रीमती संगीता पवार या बालिकेला एकटी सोडून कोणाला न सांगता पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या.

हेही वाचा- कसबा तारळे विठ्ठलाई, सिद्धेश्‍वर यात्रा रद्द..

असा घेतला जीव

याच दरम्यान दिलदूर समशेद हा त्या ठिकाणी आला. त्याने पाळण्यात झोपलेल्या मधुरा या अडीच महिन्यांच्या बालिकेच्या छातीत ठोशाने मारले. तिचा हात पिरगळला. त्यानंतर त्याने मधुराला पाळण्याबाहेर काढून लादीवर आपटले. यामुळे त्या बालिकेचा मृत्यू झाला होता. याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रत्नागिरी, समृद्धी अजय वीर यांनी लांजा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. काळजीवाहक पवार यांनी समशेद याच्याकडून बालिकेला धोका निर्माण होऊ शकतो याकडे दुर्लक्ष केले. तसेच पाणी आणायला जाताना बालिकेवर लक्ष ठेवण्यासाठी अन्य कोणत्याही कर्मचाऱ्याला न सांगता निघून गेली. 

 हेही वाचा- नृसिंहवाडीत दत्त देवाचे दर्शन स्टॅरिलियन लावल्यानंतरच...

अधीक्षिका, कर्मचाऱ्यावर गुन्हा

कामात हलगर्जीपणा केल्याचा दोषारोप तिच्यावर आहे. काळजीवाहक सुरेखा पवार या कर्णबधिर असतानाही अधीक्षिका सुरेखा बिजीतकर यांनी पवार यांच्या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. या घटनेत मृत्यू झालेल्या बालिकेला पाळण्यात ठेवून काळजीवाहक सुरेखा पवार या गेल्या असताना २/३ तास ती काय करते आहे हे न पाहता तिच्याकडे दुर्लक्ष केल्याचा तसेच हलगर्जीपणा केल्याचा ठपका अधीक्षिका बिजीतकर यांच्यावर आहे. लांजा पोलिसांनी अधीक्षिका बिजीतकर आणि काळजी वाहक पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्‍वेता पाटील या करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Superintendent employee crime in lanja kokan marathi news