संगमेश्वरातील सर्वच नद्या ओलांडणार धोक्याची पातळी; पुराचा धोका कायम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

काल मध्यरात्रीनंतर तालुक्यात मुसळधार पावसाचे थैमान सुरू आहे. गडगडाट आणि विजांचा लखलखाट आणि वादळी वाऱ्यासह धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे येथील शास्त्री खाडीने अखेर धोक्याची पातळी ओलांडून खाडीभागात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

संगमेश्वर : काल रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील सर्वच नद्या धोक्याच्या पातळीवर आल्या आहेत. फुणगुस व माखजन बाजारपेठत पुराचे पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून संगमेश्वरला पुराचा धोका आहे. असावी नदीला पूर आल्याने धामणी गोळवलीतील पाच साकव पाण्याखाली गेल्याने दोन गावांचा संपर्क तुटला आहे. साडवली येथे देवरुख - संगमेश्वर राज्य मार्गावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

काल मध्यरात्रीनंतर तालुक्यात मुसळधार पावसाचे थैमान सुरू आहे. गडगडाट आणि विजांचा लखलखाट आणि वादळी वाऱ्यासह धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे येथील शास्त्री खाडीने अखेर धोक्याची पातळी ओलांडून खाडीभागात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. फूणगूस बाजारपेठला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. अनेक ठिकाणी सखल भागात तर खाडी किनाऱ्यालगतच्या शेतात पाणी घुसल्याने शेती कामात व्यत्यय आला आहे. काही शेतकऱ्यांची भात रोपेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.

पहाटेपासून अविश्रांत कोसळणाऱ्या पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. अनेक ठिकाणी वाहणाऱ्या पाण्याने प्रवाह बदलला, तर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने रस्त्यांना नदीचे रूप आले आहे. फुणगुस आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोरीवरून पाण्याचा प्रवाह वाहत होता. त्यामुळे पादचाऱ्यांना व वाहनचालकांना या रस्त्यावरून जाणे धोक्याचे झाले आहे. फुणगुसप्रमाणे माखजन बाजारपेठेतही गड नदीच्या पुराचे पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. खाडी भागात शाळेला सुट्टी देण्यात आली आहे. खाडीभागातील कोंडये, डावखोल, मांजरे, मेढे,व खाडी पलीकडील डिंगणी, पिरदवणे आदी गावात मुसळधार पावसामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

तालुक्यातील असावी नदीला पूर आल्याने पाच साकव पाण्याखाली गेले असून दोन गावांचा संपर्क तुटला आहे. देवरुख - संगमेश्वर राज्यमार्गावर साडवली, कोसुम्ब भागात पावसाचे पाणी आल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने शास्त्री व सोनवी नदी दुथडी भरून वाहत असून संगमेश्वर बाजारपेठेला पुराचा धोका कायम आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangameshwar in danger zone All rivers will cross the danger level