esakal | संगमेश्वर : नव्या कडवई स्थानकावर थांबणार मंगळवारी पहिली पॅसेंजर
sakal

बोलून बातमी शोधा

rail

संगमेश्वर : नव्या कडवई स्थानकावर थांबणार मंगळवारी पहिली पॅसेंजर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे नव्याने उभारलेल्या रेल्वे स्थानकावर ७ सप्टेंबरला पहिली पॅसेंजर रेल्वे थांबणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्याने येथील जनतेतून आनंद व्यक्त केला जात आहे. गणेशोत्सवात हे स्थानक सुरू झाल्याने कडवई पंचक्रोशीतील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कडवई येथे रेल्वे स्थानक व्हावे या मागणीसाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पंचक्रोशीतील जनतेच्या सहभागाने लढा देण्यात आला. या लढ्यात मनसेच्या ६५ कार्यकर्त्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. आमदार शेखर निकम यांनी येथील समस्यांबाबत कोकण रेल्वेचे विभागीय संचालक संजय गुप्ता यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा केला. सुरवातीच्या काळात मनसेने यासाठी एकाकी लढा दिला होता व स्थानकास अंतिम मंजुरी मिळवली. मात्र राजकीय श्रेयाच्या चढाओढीत या कामाला गती मिळत नव्हती. काही काळानंतर राजकीय दबाव झुगारत येथील जनतेने या लढ्यात सहभाग घेतला.

हेही वाचा: रत्नागिरी : कोरोना चाचणी प्रयोगशाळेवरून वादंग

या जनआंदोलनाची दखल रेल्वे प्रशासनाला घ्यावी लागली. अखेर या स्थानकाच्या बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला. दोन वर्षात स्थानकाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. मात्र कोरोनामुळे पॅसेंजर सेवा पूर्णपणे बंद असल्याने या स्थानकावर रेल्वे थांबण्यासाठी येथील जनतेला प्रतीक्षा करावी लागली.

अखेर दिवा-सावंतवाडी पॅसेंजर सुरू करण्यात येत असल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली. मंगळवारी (ता. ७) पहिली पॅसेंजर या स्थानकावर थांबणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे गणेशोत्सवात येथील जनतेला दिलासा मिळाला आहे.

हा लढा येथील जनतेच्या पाठिंब्यामुळे यशस्वी झाला आहे. या लढ्यात सहभाग घेणाऱ्या जनतेसोबत पोलिस प्रशासन, कोकण रेल्वे प्रशासन, स्थानिक वृत्तपत्रे, सर्व ग्रामपंचायतींनी पाठपुरावा केला. लोकप्रतिनिधींनीनी या स्थानकाची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी आपण सदैव त्यांच्यासोबत असू.

- जितेंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रत्नागिरी

loading image
go to top