सावंतवाडीत केसरकरांना राणेंनी दिला धक्का

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 डिसेंबर 2019

सावंतवाडी येथील नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रिया आज येथील जिमखाना येथे कडक बंदोबस्तात झाली. पहिल्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे बाबू कुडतरकर 301 मतांनी आघाडीवर राहिले आहेत.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे संजू परब यांनी अखेर बाजी मारली आहे. शिवसेनेचे उमेदवार बाबू कुडतरकर यांचा या निवडणूकीत पराभव झाला.  परब यांनी ३१३ इतक्या मतांनी विजय मिळवला. या विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला.

सावंतवाडी येथील नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रिया आज येथील जिमखाना येथे कडक बंदोबस्तात झाली. पहिल्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे बाबू कुडतरकर 301 मतांनी आघाडीवर राहिले आहेत. दुसऱ्या क्रमांकाची मते भाजपचे उमेदवार संजू परब याना मिळाली. तिसऱ्या क्रमांकाची मते ऍड. दिलीप नार्वेकर यांनी मिळविली. अपक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, बबन साळगावकर आणि अमोल साटेलकर पिछाडीवरच राहिले. मात्र दुसऱ्या फेरीत संजू परब यांनी २५० मतांनी आघाडी मिळवली. ही आघाडी त्यांनी तिसऱ्या फेरीतही कायम ठेवली व अखेर ३१३ मतांनी ते विजयी झाले. 

हेही वाचा - कातळशिल्पांना प्रकाशात आणण्यासाठी यांनी घेतला पुढाकार 

राणेंचे वर्चस्व सिद्ध

आमदार दीपक केसरकर आणि खासदार नारायण राणे यांची प्रतिष्ठा या निवडणूकीतपणाला लागली होती. राणे भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी कोकण भाजपमय करण्याचा निर्धार केला आहे. यामुळे सावंतवाडी नगराध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांनाचा लागली होती. अखेर भाजपचे संजू परब यांनी निवड झाल्याने आता राणेंचे वर्चस्व पुन्हा एकदा कोकणात सिद्ध झाले आहे. या निकालाने आमदार केसरकर यांना धक्का मानला जात आहे. 

हेही वाचा - PHOTOS : सुखद ! अन् 118 कासवांची पिल्ले सुखरूप समुद्रात 

मतांचा टक्का घसरल्याचा भाजपला फायदा

नगराध्यक्षपदाच्या पोट निवडणुकीसाठी सहा उमेदवार रिंगणात होते.  ही निवडणूक दरवेळेप्रमाणे नारायण राणे विरुद्ध दीपक केसरकर अशीच झाली. भाजपचे उमेदवार संजू परब व महाविकास आघाडीचे उमेदवार बाबू कुडतरकर यांच्यात चुरस झाली.. कॉंग्रेसचे ऍड. दिलीप नार्वेकर, भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवार सौ. अन्नपूर्णा कोरगावकर आणि अपक्ष लढत असलेले माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनीही आव्हान उभे केले होते. या निवडणूकीत मताचा टक्का घसरला होता. चुरशीच्या झालेल्या येथील नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी 57.46 टक्‍के मतदान झाले. 18 हजार 28 पैकी 10 हजार 359 जणांनी मतदानाचा हक्‍क बजावला. यात महिला 4916 व पुरुष 5443 यांचा समावेश आहे. मतदानाचा घटलेला टक्का कोणाच्या पथ्थ्यावर पडणार आणि कोणाचा तोटा होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहीले होते. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanju Parab Wins In Sawantwadi City President Election Marathi News