esakal | संकेश्‍वर-बांदा रस्ता सिंधुदुर्गातील बावळाट की सावंतवाडी मार्गे? 
sakal

बोलून बातमी शोधा

द

संकेश्‍वर ते बांदा रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक पथक जमिन संपादनासह अन्य माहिती घेत आहे.

संकेश्‍वर-बांदा रस्ता सिंधुदुर्गातील बावळाट की सावंतवाडी मार्गे? 

sakal_logo
By
भूषण अरोसकर

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या नियोजित संकेश्‍वर ते बांदा रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचे पथक दाखल झाले आहे. सिंधुदुर्ग, कर्नाटक व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडल्या जाणाऱ्या महामार्गाचा अभ्यास करून प्रकल्प अहवाल तयार करून तो केंद्राला सादर केला जाणार आहे. हा मार्ग बावळाट की सावंतवाडी मार्गे हे ठरवण्यात या अहवालाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 

पथकाने गुरुवारी (ता. 29) दिवसभर आंबोली तसेच बावळाट इन्सुली मार्गाची पहाणी केली आहे. पथक ग्रामस्थांच्या अडचणी तसेच महामार्ग हस्तांतरणासाठी लागणारी जमीन यांची माहिती घेत आहे. हा मार्ग सावंतवाडीतून गेल्यास येणारा खर्च तसेच बावळाटमार्गे होणारा खर्च, आंबोली घाट रस्त्याची माहिती पथकाकडून घेतली जात आहे. नव्याने केंद्राच्या रस्ते विकास विभागाकडून प्रस्तावित केलेला बांदा संकेश्‍वर मार्ग कर्नाटक, कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडला जाणार आहे. या मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. 
यासाठी केंद्राच्या रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी दोन सिंधुदुर्गमध्ये आले आहेत. या अधिकाऱ्यांनी सुरूवातीला संकेश्‍वर येथून या रस्त्याची सुरूवात होणार असल्याने तेथे पाहाणी केली. त्यानंतर पथक सिंधुदुर्गमध्ये दाखल झाले आहे. पथकाने सावंतवाडी येथे येऊन बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत माने तसेच उपविभागीय अभियंता संजय आवटी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पथकाने प्रत्यक्ष सातुळी बावळाट तसेच बांद्यापर्यंत जाऊन पाहाणी केली. त्यानंतर सावंतवाडी शहर व इन्सुली येथील रस्त्याची पाहणी केली. 
प्रामुुख्याने हा मार्ग कुठून बांदा येथे जोडणे सोयीस्कर होईल, याचीही माहिती घेत आहे. 

केंद्रीय पथक रस्त्याचा प्रकल्प अहवाल तयार करत असतानाच रस्त्याला प्रत्यक्षात येणारा खर्च तसेच कमी होणारे अंतर, कमीत कमी भू संपादन करावे लागेल, असा मार्ग, ग्रामस्थांच्या समस्या याची माहिती पथक घेईल. ते मुद्दे अहवालात येतील. पथकामध्ये चार अधिकारी असून या मार्गासाठी नेमण्यात आलेल्या खासगी एजन्सीचे अधिकारीही सहभागी झाले होते; पण सध्यातरी पथक कोणत्या मार्गावर शिक्कामोर्तब करणार हे अद्याप निश्‍चित नाही. केंद्राच्या रस्ते महामार्ग विभागाला संपूर्ण अहवाल दिल्यानंतरच मार्ग निश्‍चिती होईल. 

  • पुणे येथून आलेले पथक बांदा तसेच सातुळी- बावळाट येथील रस्त्याची पाहणी करत आहे. त्यांनी सावंतवाडी व इन्सुली येथील रस्त्याची पाहणी केली आहे. पथक ग्रामस्थांच्या अडचणी तसेच रस्त्यासाठी जागा हस्तांतरण याबाबत माहिती घेत आहेत.

- श्रीकांत माने, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम, सावंतवाडी 

संपादन : विजय वेदपाठक

loading image