फिशिंगला सरंग्याचा आधार ; ट्रॉलिंगच्या जाळ्यात पापलेट आणि म्हाकुळ

राजेश कळंबटे
Monday, 21 September 2020

व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आटापिटा करून मासेमारीसाठी जाणाऱ्यांना थोडीफार मासळी मिळते.

रत्नागिरी : खोल समुद्रात पाण्याला प्रचंड करंट असल्याने मच्छीमारांच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे. व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आटापिटा करून मासेमारीसाठी जाणाऱ्यांना थोडीफार मासळी मिळते. पर्ससीननेटला गेदर, तर ट्रॉलिंगवाल्यांच्या जाळ्यात पापलेट आणि म्हाकुळ मिळतोय. फिशिंगच्या बोटींना सरंगा मिळू लागला आहे. वादळामुळे गेल्या आठवड्यात थांबलेल्या फिशिंगच्या बोटींना सरंग्याचा आधार मिळाल्याने समाधान व्यक्‍त केले जात आहे.

हेही वाचा - कोकणात ऑनलाईन रिपोर्टमध्ये कृषीच्या १२ घटकांचा समावेश ; एका क्लिकवर मिळतोय ताळेबंद 

 

हवामान विभागाने २२ सप्टेंबरपर्यंत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. किनारी भागात वारे वाहत असून, समुद्र खवळलेला आहे. नौका पाण्यात उभ्या करून मासेमारी करणे अशक्‍य आहे. काल (१९) मिरकरवाडा, साखरतर, काळबादेवी येथील काही फिशिंगवाल्या नौकांना ३० ते ४० किलो सरंगा मिळाला. हा पापलेटचा प्रकार असून, तो चविष्ट असतो. मिरकरवाडा जेटीवर सरंग्यासाठी अनेक खवय्यांनी धाव घेतली. १७० रुपयांपासून ४३० रुपये किलो दर मिळाला. सुपर सरंग्याला अधिक दर मिळत असून, तो निर्यातीसाठी पाठविला जातो. हा मासा १५ ते २० वावात मिळत असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. त्याबरोबरच फिशिंगला बला मासा मिळत आहे. ७० ते ८० किलो बला मिळत असून, तो प्रक्रिया कंपनीला साधारणपणे ७० रुपये किलोने विकला जातो.

पर्ससीनेटलाही बऱ्यापैकी मासळी मिळत आहे. सध्या २० ते ४० डिश (एक डिश ३२ किलो) गेदर मिळत आहे. किलोला १५०० ते १८०० रुपये दर मिळतोय. ट्रॉलिंगद्वारे मासेमारी करणाऱ्यांना ५ ते १० किलो पापलेट व म्हाकुळी बऱ्यापैकी मिळतोय. पापलेटला किलोचा दर ५०० ते १००० रुपयांपर्यंत आहे. गेल्या १५ दिवसांत खोल समुद्रात अचानक परिस्थिती बदलली तर सुरक्षेसाठी मच्छीमारांना जवळच्या बंदरांचा आधार घ्यावा लागत आहे.

हेही वाचा -  कोकण रेल्वेच्या अभियांत्रिकी कौशल्याची झलक दिसणार ; नेपाळमध्ये डेमू ट्रेन धावणार 

 

खर्च अंगावर

वादळाचा सर्वाधिक परिणाम छोट्या मच्छीमारांवर म्हणजेच गिलनेटवाल्यांवर होतो. ते १० ते १५ वावात मासेमारी करतात. गेल्या आठवड्यात गिलनेट मासेमारी बंद होती. चार दिवसांपूर्वी वादळामुळे हर्णै, देवगडसह जयगड बंदरात अडकून पडलेले कासारवेलीतील गिलनेटवाले मच्छीमार काल माघारी परतले. त्यांना खर्च अंगावर पडला.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saranga fish helps to fisherman in konkan useful for daily sales in ratnagiri