esakal | रूग्णांवर व्हरांड्यात उपचार घेण्याची वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

रूग्णांवर व्हरांड्यात उपचार घेण्याची वेळ

रूग्णांवर व्हरांड्यात उपचार घेण्याची वेळ

sakal_logo
By
अक्षय साबळे

साटेली भेडशी : दोन वर्षे उलटूनही साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पूर्ण झालेली नाही. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. भर पावसात जुन्या इमारतींच्या उघड्या व्हरांड्यातच खाटा टाकून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जागा नसल्याने बहुतेकांना दोडामार्ग किंवा गोव्याला पाठवले जात आहे. आरोग्य यंत्रणेची ही अवस्था पाहून संताप व्यक्त होत आहे.

कोरोना काळात तर रुग्णांची आणि नातेवाईकांची फरफट होत होती. रुग्ण आणि नातेवाईक मरणयातना भोगत आहेत तर ठेकेदार सुशेगाद आहेत. रस्ते, रुग्णवाहिका, ॲम्युजमेंट पार्क यावरून सोशल मीडियावर भाषणबाजी आणि आरोप-प्रत्यारोप करणारे तालुकावासीय, राजकीय पुढारी आणि लोकप्रतिनिधी साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अपूर्ण इमारतीबाबत एक शब्दही बोलत नसल्याचे दिसते.

सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आरोग्य केंद्राचे काम तत्काळ पूर्ण करवून घेण्याची मागणी केली आहे. खर तर ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांसाठी हे आरोग्य केंद्र आहे. गरीब, गरजू रुग्ण येथे उपचार घ्यायचे; पण इमारतीचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने रुग्णांना दोडामार्ग, ओरोस, सावंतवाडी, कुडाळ, गोवा येथे जावे लागते. त्यासाठी उसनवारीची वेळ रुग्णांवर येते. त्याचे तालुक्यातील लोकप्रतिनिधींना सोयरसुतक नाही.

सभापतीपद असूनही फायदा नाही

दुर्दैवाने जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि शिक्षण व आरोग्य सभापतीपद दोडामार्ग तालुक्याकडेच आहे. पैकी कुणीही इमारतीच्या अपूर्ण कामाकडे अथवा लोकांच्या परवडीकडे पहायला तयार नाहीत. त्यामुळे लोकांच्या हालअपेष्टा दिवसेंदिवस वाढत आहेत. संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी आपल्याच तालुक्यातील रुग्ण आणि नातेवाईकांना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी होत आहे.

आरोग्य केंद्रासाठी आंदोलनाचा इशारा

तालुक्यातील तेरवण, मांगेली, केंद्रे, हेवाळे, केर, भेकुर्ली, निडलवाडी आदी दुर्गम गावांसह निम्मा तालुका या आरोग्य केंद्रावर अवलंबून आहे; पण इमारत अपूर्ण असल्याने आणि जुन्या इमारतीत काहीच सुविधा नसल्याने रुग्णांची फरफट होत आहे. त्यामुळे तत्काळ काम पूर्ण करवून घेऊन इमारतीचे लोकार्पण करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा प्रवीण गवस यांनी दिला आहे.

पंचायत समिती उपसभापती सुनंदा धर्णे आदींनी मेमध्ये आरोग्य केंद्राच्या इमारतीची पाहणी केली होती. पावसाळ्याआधी इमारत पूर्ण करून ताब्यात द्यावी, असे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते. तरीही इमारतीचे काम अपूर्ण आहे. रुग्णांचे हाल होताहेत. संबंधितांवर कारवाई करावी.

- डॉ. आनिशा दळवी, आरोग्य व शिक्षण सभापती, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग

साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी २ कोटी ९३ लाख रूपये मंजूर आहेत. अद्याप काही कामे अपूर्ण आहेत. काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराने डिसेंबरपर्यंत मुदतवाढ घेतली आहे. त्यामुळे डिसेंबरअखेर कामे पूर्ण करून इमारत आमच्या ताब्यात दिली जाईल.

- बी. पी. पाटील, कनिष्ठ अभियंता, बांधकाम विभाग

अवलंबून गावे अंदाजे

२५ ते ३०

इमारतीसाठी मंजूर निधी

२ कोटी ९३ लाख

loading image
go to top