`या` धबधब्यावर वर्षा पर्यटन यंदा बंद 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध वर्षा पर्यटनाचे ठिकाण म्हणून सावडाव धबधब्याकडे पाहिले जाते. पण यंदा पर्यटनांसाठी हा परिसर बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी घेतला आहे. सावडाव धबधब्याकडे पर्यटनांसाठी यावर्षी येऊ नये, असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे. तसे फलकही लावले आहेत.

नांदगाव ( सिंधुदर्ग ) - पावसाळ्यात रविवार व सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनी ओसांडून वाहणाऱ्या सावडाव धबधब्याकडे जाणारे मार्ग खबरदारी म्हणून काटेरी फांद्या व दगड टाकून बंद करण्यात आले आहेत. कोरोना महामारीने जगभरात थैमान घातले आहे. या पार्श्‍वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध वर्षा पर्यटनाचे ठिकाण म्हणून सावडाव धबधब्याकडे पाहिले जाते. पण यंदा पर्यटनांसाठी हा परिसर बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी घेतला आहे. सावडाव धबधब्याकडे पर्यटनांसाठी यावर्षी येऊ नये, असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे. तसे फलकही लावले आहेत. 

निसर्गरम्य परिसर, हिरवीगार गर्द झाडी, उंचावरून फेसाळणारा सावडाव धबधबा अल्पावधीतच पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळसह इतर राज्यातून हजारो पर्यटक दरवर्षी वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात.

दरवर्षी शनिवार, रविवार व सुट्टीच्या होणारी गर्दी लक्षात घेऊन धबधब्याकडे येणाऱ्या पर्यटकांकडून नियम पाळले जाणे कठीण आहे. यासाठी यावर्षी हे ठिकाण पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटकांनी वर्षा पर्यटनासाठी यावर्षी घरीच राहून शासनाच्या नियमाचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच अजय कदम, उपसरपंच दत्ता काटे, ग्रामसेवक शशिकांत तांबे यांनी केले आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savdav Water Fall Shut For Monsoon Tourism Sindhudurg Marathi News