दिसायला महाकाय; पण अपंग, उचलता उचलेना, रेस्कू टीम आली अन्....

निलेश मोरजकर
Monday, 7 September 2020

तेथीलच शांताराम तुळसकर यांना सायंकाळच्या सुमारास ओढ्यामध्ये भली मोठी मगर निदर्शनास आली. त्यांनी वेळ न दवडता स्थानिक प्राणी मित्र डॉ. रेडकर यांना माहिती दिली.

बांदा (सिंधुदुर्ग) - सातार्डा-देऊळवाडी येथे ओढ्यात आढळलेल्या महाकाय मगरीला रेस्क्‍यू टीमच्या सदस्यांनी पकडून निसर्ग अधिवासात सोडले. ही घटना काल (ता.5) रात्री घडली. मगर एका पायाने अपंग होती, तसेच दोनशे ते अडिचशे किलो तीचे वजन होते, अशी माहिती सिंधुदुर्ग वाईल्ड लाईफ ईमरजन्सी रेस्क्‍यू सर्व्हीसेसचे अध्यक्ष अनिल गावडे यांनी दिली. 

तेथीलच शांताराम तुळसकर यांना सायंकाळच्या सुमारास ओढ्यामध्ये भली मोठी मगर निदर्शनास आली. त्यांनी वेळ न दवडता स्थानिक प्राणी मित्र डॉ. रेडकर यांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मगरीचा मागील एक पाय नसल्याचे लक्षात आले. तत्काळ याची माहिती वाईल्ड लाईफचे अध्यक्ष गावडे यांना देण्यात आली. 

वन्यजीवांच्या बचावासाठी सदैव तत्परतेने कार्य करत असलेली टीम कुडाळहून काही वेळातच सातार्ड्यात दाखल झाली. डॉ. रेडकर यांनी या मगरीला स्थानिकांच्या मदतीने पकडून ठेवले होते. वाईल्ड लाईफच्या टीमने अखेर या मगरीला ताब्यात घेतले. अंदाजे दोनशे ते अडीचशे किलो वजनाच्या या मगरीला दोनशे मीटर दूर असलेल्या रस्त्यावर उचलून नेणे या टीमला शक्‍य नव्हते. अखेर वाईल्ड लाईफचे अध्यक्ष अनिल गावडे यांनी इतरांच्या मदतीने मगरीला रस्त्यावर आणले. 

मगर पकडल्यानंतर गावडे यांनी सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे यांना माहिती दिली. संबधित अधिकाऱ्यांनी मगरीला पुन्हा निसर्ग अधिवासात सोडले. मगरीची लांबी चौदा ते पंधरा फुट आणि वय सोळा ते सतरा वर्षे असावे, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी वाईल्ड लाईफच्या टिमचे वैभव अमृस्कर, ओंकार लाड, डॉ. प्रसाद धुमक, सिद्धेश ठाकुर आणि वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saved the crocodile satarda konkan sindhudurg