सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाचे पाण्यासाठी अनोखे घागर आंदोलन

भूषण आरोसकर 
Thursday, 15 October 2020

पालिकेचे अनुभवी आणि ज्येष्ठ नगरसेवक असलेले राजू बेग यांनी रिकामी घागर घेत पाणी प्रश्नाविरोधात  पालिकेत चक्क ठिय्या मांडलेला दिसून आला.

सावंतवाडी : सत्ताधारी पक्षातीलच नगरसेवकाला आज रिकामी घागर घेऊन बसण्याची वेळ आली. ही गोष्ट बघ्यांसाठी मात्र विचित्रच होती. मात्र तसे चित्र आज सकाळी पालिकेत ये जा करणाऱ्यांच्या दृष्टीस पडले. पालिकेचे अनुभवी आणि ज्येष्ठ नगरसेवक असलेले राजू बेग यांनी रिकामी घागर घेत पाणी प्रश्नाविरोधात  पालिकेत चक्क ठिय्या मांडलेला दिसून आला. कुठलीही कल्पना नसताना नगरपालिकेच्या दारायच त्यांचा हा पवित्रा पाहून प्रशासनाची मात्र एकच धांदल उडाली. 

बेग यांनी गेली कित्येक वर्षे पालिकेत काम केले आहे. माठेवाडा, बाहेरचावाडा भागाचे ते नगरसेवक आहेत. बुराण गल्ली माठेवाडा, दत्तनगर भागात पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने त्यांनी हे आंदोलन केले. त्यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले.

हे पण वाचाकर्ज देण्याच्या बहाण्याने तरूणाला लाखाचा गंडा 

 एकीकडे  नगरपालिका २४ तास पाणीपुरवठा करण्याचा टेंभा  मिरविते तर दुसरीकडे आपल्या भागातील नागरिकांना दोन तास पाणी देण्यास हीच पालिका अपयशी का ठरते? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा या उद्देशानेच बेग यांनी आंदोलन छेडल्याचे लक्षात आल्यावर काहींनी त्यांच्या या आंदोलनाचे कौतुक केले. या आगळ्या वेगळ्या सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाच्या आंदोलनाची मोठी चर्चा मात्र शहरात रंगली होती.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sawantwadi corporation protest in municipal corporation