दोन दिवस बाजारपेठ बंद, पण कोणती?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

तालुका व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक संघाने उत्स्फूर्तपणे हा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी आज सांगितले. 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सावंतवाडी तालुका बाजारपेठ शनिवार (ता.21) आणि रविवारी (ता.22) संपूर्ण दिवस बंद राहील. यानंतर दिवसआड बाजारपेठ बंद ठेवली जाणार आहे. तालुका व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक संघाने उत्स्फूर्तपणे हा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी आज सांगितले. 

कोरोनामुळे खळबळ उडाली आहे. प्रादूर्भाव रोखणे हाच त्यावरचा उपाय आहे. यासाठी गर्दी टाळणे आवश्‍यक आहे. या पार्श्‍वभूमीवर व्यापारी संघाने तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याशी चर्चा केली. तहसीलदारांनी शनिवार, रविवार व त्यापुढील म्हणजेच सोमवारपासून एक दिवस आड बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत मुद्दा मांडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी "जनता कर्फ्यू'चा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रविवारी बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत तहसीलदार म्हात्रे आणि व्यापारी उद्योजक यांच्याशी चर्चा झाल्यावर निर्णय घेण्यात आला आहे, असे ेमांजरेकर यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब बोडेकर, सुमंगल कालेकर, श्रीपाद चोडणकर, अभय पंडित आदी उपस्थित होते. 

तालुक्‍यातील बाजारपेठ सोमवारी (ता. 23) सुरू राहील व त्यानंतर एक दिवस आड संपूर्ण बाजारपेठ बंद राहील. याची सर्व व्यापारी बांधवांनी व नागरिकांनी नोंद घ्यावी. व्यापारी बांधवांनी सरकारला सहकार्य करावे, कारण ही राष्ट्रीय आपत्ती आहे, असे श्री. मांजरेकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sawantwadi Market closed for two days