Sawantwadi | मी केलेल्या कामामुळे पालिकेला गुण; बबन साळगावकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Baban Salgavkar

मी केलेल्या कामामुळे पालिकेला गुण; बबन साळगावकर

सावंतवाडी - देशामध्ये 67 व्या स्थानी नेऊन ठेवलेली नगरपालिका आज 255 व्या स्थानी आहे. माझ्या कार्यकाळात झालेल्या कारिवडे येथील घनकचरा प्रकल्पामुळेच स्वच्छता अभियानात पालिकेला गुण मिळत आहेत. त्यामुळे 255 या स्थानी शहर नेऊन पाठ थोपटून घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे हे अपयश आहे, अशी टीका माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली.

अलीकडेच झालेल्या कॉन्सिल बैठकीमध्ये कचऱ्याच्या बाबतीत शहरातील नागरिक सहकार्य करत नसल्याचे सांगून नागरिकांना दोष देणे ही बाब गंभीर असून सत्ताधारी आणि विरोधकांचे हे कृत्य निषेधार्ह असल्याचेही श्री. साळगावकर म्हणाले.

माजी नगराध्यक्ष साळगावकर यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. यात त्यांनी स्वच्छतेच्या बाबतीत सत्ताधारी आणि विरोधकांवर निशाणा साधला आहे. पत्रकामध्ये म्हटले आहे की, कारिवडे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. यामध्ये 2 कोटी 74 लाख रुपये घनकचरा व्यवस्थापनासाठी आहेत तर आपल्या कार्य काळामध्ये त्या प्रकल्पाचे काम होताना 48 लाख रुपयाचे चिरेबंदी कुंपण, 19 लाख रुपयाचे गेट, दोन कोटी रुपयाची फॅक्टरी शेड उभारण्यात आले आहे.

हेही वाचा: एसटीच्या संपाने गावगाडा थांबला; गैरसोय आणि त्रास, व्यवहार ठप्प

जवळपास 90 टक्के काम हे आपण पूर्ण करून घेतले होते. त्यामध्ये 80 नारळाची झाडे, 160 सुपारी व आंतरपीक म्हणून लिंबूची झाडे ही लावण्यात आले आहे; मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांना हा प्रकल्प नव्वद टक्के यावरून अद्यापही शंभर टक्के पूर्ण करता आला नाही. हे सत्ताधार्‍यांचे अपयश असून आज स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये जे गुण पालिकेला प्राप्त होतात ते मी घनकचरा प्रकल्पामध्ये केलेल्या कामाचे आहेत.

श्री. साळगावकर यांनी पत्रकात पुढे म्हटले की, आपल्या देशामध्ये सावंतवाडी नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये 67 व्या स्थानी नेऊन ठेवली होती; मात्र आज हीच पालिका 255 व्या स्थानी आहे. हे सत्ताधारी कारभार्‍यांचे अपयश आहे. आज शहरामध्ये ठिकाणी अस्तव्यस्त पडलेला कचरा दिसून येत आहे. एक स्वच्छ, सुंदर शहर दोन वर्षांमध्ये किती बकाल झाले हे शहरवासीयांनी अनुभवला आहे. आजपर्यंत याच शहरवासीयांनी सहकार्य करून अनेक स्वच्छता अभियानामध्ये मला व पालिकेला सहाय्य केले होते म्हणूनच पालिका 67 व्या स्थानी आली होती; परंतु आज 255 व्या स्थानी शहर नेऊन ठेवणारे सत्ताधारी आपली पाठ थोपटून घेत आहेत. एकूणच हा प्रकार म्हणजे हास्यास्पद असून अपयश लपवण्याचे ते प्रयत्न करत आहेत.

loading image
go to top