पहिल्या दिवशी नियमांचे पालन, दुसऱ्या दिवशी `येरे माझ्या मागल्या`

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

अत्यावश्‍यक सेवेअभावी अन्य कोणीही विनाकारण रस्त्यावर फिरू नये तसेच अत्यावश्‍यक सेवेच्या दुकानाशिवाय अन्य दुकानेही बंद ठेवावीत, असे आदेश लॉकडाउनमध्ये होते.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यामध्ये कालपासून (ता.2) जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी लॉकडाउन जाहीर केला. याला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला; मात्र आज लॉकडाउनची नागरिकांनी "ऐशी की तैशी' करून ठेवल्याचे दिसून आले. बाजारपेठेत ग्राहकांचा दुचाकीवरून मुक्त संचार होता. पोलिस बंदोबस्त मात्र नावापुरताच दिसून आला. 

कणकवलीत अचानक कोरोनाचे जास्त रुग्ण सापडले तसेच जिल्ह्यातील रुग्णांची संख्याही 200 पार झाल्याने या व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी तातडीने आदेश देत 2 ते 8 जुलै यादरम्यान लॉकडाउन घोषित केला. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना बंदी घालण्यात आली. तसेच विनाकारण बाहेर न फिरण्यांनाही सुचित करण्यात आले. अत्यावश्‍यक सेवेअभावी अन्य कोणीही विनाकारण रस्त्यावर फिरू नये तसेच अत्यावश्‍यक सेवेच्या दुकानाशिवाय अन्य दुकानेही बंद ठेवावीत, असे आदेश लॉकडाउनमध्ये होते.

पहिल्या दिवशी लॉकडाउनला जिल्ह्याभरात चांगला प्रतिसाद मिळाला. येथील शहरात अत्यावश्‍यक सेवेच्या दुकानाशिवाय अन्य दुकानेही बंद होती. कडक बंदोबस्त असल्याने नागरिकांनी घरातच रहाणे पसंत केले. असे असताना दुसऱ्या दिवशीचे लॉकडाउन मात्र पूर्णतः फेल गेल्याचे दिसून आले. आज बाजारपेठेतील काही दुकानेही सुरू होती. बाजारपेठेमध्ये विविध ठिकाणी पोलिस तैनात होते; मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. दुचाकी वाहन गाड्यांना बंदी असतानाही सराईतपणे दुचाकीस्वार शहरात फिरताना दिसून येत होते. त्यावरून नागरिक या लॉकडाउनबाबत नाराज असल्याचे दिसून आले. 

लॉकडाउनमुळे संभ्रमावस्था 
याआधीच जिल्हा व्यापारी संघाकडूनही लॉकडाउनबाबत मोठी नाराजी व्यक्त केली होती. नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची लॉकडाउनबाबत असलेली ही नाराजी उघडपणे दिसून आली. येथील बाजारपेठेत ज्या प्रमाणात नागरिक दाखल झाले होते ते पाहता काही नागरिकांच्या मनात लॉकडाउनमध्ये शिथिलता आणली का? असा प्रश्‍नही निर्माण झाला होता. बाजारात झालेली गर्दी पाहता लॉकडाउनबाबत काही व्यापारी व नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sawantwadi people rejects lockdown rules