
एसटी स्टॅंडवर रात्री बाराच्या सुमारास एक महिला एकटीच असल्याचे रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती येथील पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार नवनाथ शिंदे यांना दिली.
एसटी स्टॅंडवर रात्री बाराला एकट्या महिलेला पोलिसांनी पाहिले अन्...
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - निर्भया प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून महिलांची विशेष दक्षता घेण्यात येत आहे. यामध्ये रात्री अपरात्री एकट्या महिलांना त्यांच्या घरी सुस्थितीत पोहोचवण्याचे काम स्थानिक पोलिस यंत्रणेकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर काल रात्री (ता.10) येथील पोलिसांनी ओटवणे येथील प्रमिला राऊळ नामक महिलेला रात्री दीड वाजता सुस्थितीतील घरपोच केले.
महिलेला धीर देत विचारणा केली
येथील एसटी स्टॅंडवर रात्री बाराच्या सुमारास एक महिला एकटीच असल्याचे रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती येथील पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार नवनाथ शिंदे यांना दिली. त्यांनी याबाबतची कल्पना महिला पोलीस ज्योती दुधवडकर यांना देताच त्यांनी तातडीने हालचाली करत याबाबत वाहनचालक जॉन सिक्वेरा यांना येथील पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. चालक सिक्वेरा यांच्यासोबत ठाणे अंमलदार शिंदे आणि रामचंद्र साटेलकर तसेच महिला पोलीस धुमाळे यांना त्या महिलेकडे पाठविले. सौ. धुमाळे यांनी त्या महिलेला धीर देत विचारणा केली असता त्यांनी गोव्याला गेलो होतो; मात्र ओटवणे येथे जाण्यासाठी गाडी नसल्याने या बसस्थानकावर थांबावे लागल्याची माहिती दिली. धुमाळे यांनी त्यांचा पत्ता विचारून त्यांना पोलिस वाहनात बसविले. ही कार्यवाही रात्री साडेबाराच्या सुमारास झाली. त्यानंतर रात्री सव्वा एक दीड वाजण्याच्या सुमारास ओटवणे-राऊळवाडी येथील पत्त्यावर जाऊन त्यांना सुस्थितीत त्यांच्या घरी पोचवले. पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांनी मार्गदर्शन केले.
वाचा - धक्कादायक : सेजल कदमची जीवनातून एक्झिट