सावंतवाडी : केसरकरांच्या जाण्याने शिवसेना ‘आझाद’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena

सावंतवाडी : केसरकरांच्या जाण्याने शिवसेना ‘आझाद’

सावंतवाडी : आमदार दीपक केसरकर शिंदे गटासोबत गेल्याने सावंतवाडी मतदारसंघामध्ये शिवसेना आझाद झाली. त्यामुळे अजूनही मी शिवसेनेत आहे, असे म्हणून केसरकरांनी जनतेची फसवणूक करू नये. स्वतःची उरलेली दोन वर्षे त्यांनी कशीबशी ढकलावीत, अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आज येथे केली.

मंत्रिपदाच्या लालसेपोटी शिंदे गटासोबत गेलेल्या केसरकरांनी कधीच संघटना बांधली नाही. त्यामुळे त्यांना कार्यकर्त्यांची कदर नाही. येणाऱ्या काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो उमेदवार या ठिकाणी देतील, त्याला निवडून आणू, असा दावाही श्री. पडते यांनी केला. श्री. पडते आज सावंतवाडीत आले असता त्यांनी येथील शिवसेना शाखेमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी महिला जिल्हाप्रमुख जानवी सावंत, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, महिला तालुकाप्रमुख अपर्णा कोठावळे, शब्बीर मणियार, मायकल डिसोजा, सुनील गावडे, गुणाजी गावडे, रश्मी माळवदे, स्नेहा मिठबावकर, अनुष्का कलंबिस्तकर, भारती कासार आदी उपस्थित होते.

पडते म्हणाले, ‘‘सावंतवाडी तालुक्यामध्ये केसरकरांसोबत हाताच्या बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते गेले आहेत. तेही राष्ट्रवादीमधून आलेले कार्यकर्ते आहेत; मात्र सच्चा शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेमध्येच थांबला आहे. केसरकर केवळ मंत्रिपदासाठी शिंदे गटासोबत गेले. उलट आम्हाला आमदार वैभव नाईकांचा अभिमान आहे. केसरकर कोरोना काळात मुंबईत लपून बसले होते. शिवसेनेच्या जोरावर मंत्रिपद भोगलेल्या केसरकरांनी येथील जनतेला विकासाची अनेक स्वप्ने दाखविली.

चष्मा कारखाना, सेटअप बॉक्स आणि अनेक प्रकल्प आणणार, असे सांगितले; मात्र हे प्रकल्प कुठे आहेत? शासकीय मेडिकल कॉलेज, चिपी विमानतळ आदी प्रकल्प उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात झाले. येथील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी ४० कोटी रुपये उद्धव ठाकरे यांनीच दिले होते. ’’

भाषाही बदलली

केसरकरांची राजकीय वाटचाल पाहता पक्ष बदलल्यावर त्यांची भाषा बदलते, असे दिसते. आताही त्यांची भाषा बदलली असून, इतके दिवस उद्धव ठाकरे यांचे गुणगान गाणारे केसरकर आज एकनाथ शिंदेंचे गुणगान करीत आहेत, अशी टीका यावेळी जानवी सावंत यांनी केली.

Web Title: Sawantwadi Shiv Sena Mla Deepak Kesarkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..