शिष्यवृत्ती गुणवत्ता परीक्षेत जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थीच ठरले सरस

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

गुहागरकरने २६० गुण मिळवून तालुक्‍यात प्रथम तर रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय गुणवत्ता ग्रामीण यादीत ६ वा क्रमांक मिळवला.

दाभोळ (रत्नागिरी) : नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत दापोली तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतून तब्बल १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले असून, दापोली शिक्षण विभागाच्या शिरपेचात मानाचा तुराच त्यांनी रोवला. 

आदर्श डिजिटल शाळा असोंड शाळेतील ओजस गुहागरकरने २६० गुण मिळवून तालुक्‍यात प्रथम तर रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय गुणवत्ता ग्रामीण यादीत ६ वा क्रमांक मिळवला. जिल्हा परिषद शाळेची यशस्वी पताका त्याने फडकावली.

ओजस गुहागरकर राष्ट्रीय ग्रामीण तर वेदश्री सुर्वे (विसापूर खातलोली), वैष्णवी जांभळे (गिम्हवणे), पृथ्वीराज बाचीपाळे (कोंढे), यशराज पाटील (आवाशी नं. १), श्रावणी अदावडे (ओणनवसे पाटीलवाडी), आर्यन बारे (वणौशी गुरववाडी), पियुष करबेले (ओळगाव), श्रीष मयेकर (पंचनदी), सुजल भुवड (वणौशी भरणेवाडी), आदर्श रेवाळे (बोरिवली), वेदांत भुवड (चिखलगाव), अनन्या मांजरेकर (ओळगाव), श्रुती बेणेरे (आसुद नं. २), रिया घडवले (कोंढे) या सर्व विद्यार्थ्यांनी जिल्हा ग्रामीणमध्ये तर कशिष कदम हिने शहरी विभागात तसेच इ. आठवी ग्रामीण सर्वसाधारणमध्ये तझमीन सावरटकर (टेटवली उर्दू ) शाळेतील विद्यार्थिनीने दुसरा क्रमांक मिळवून, दापोलीचा वेगळा ठसा उमटवल्याचे गटशिक्षणाधिकारी संतोष भोसले यांनी सांगितले. 

हेही वाचा -  आता शिक्षक, विद्यार्थ्यांचीही कोरोना चाचणी होण्याची शक्यता ? -

ते पुढे म्हणाले की, हे यश म्हणजे व्हीजन दापोलीचे कार्यवाह सुनील कारखेले आणि टीमचे यशस्वी नियोजन तसेच मार्गदर्शक शिक्षक, पालक तथा निवासी शिबिराची यशस्वी धुरा हाताळणारे केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी विजय बाईत, पद्मन लहांगे, कल्याणी मुळ्ये, व्हीजनची मुख्य समिती, शिष्यवृत्ती समिती तसेच सर्व शिक्षक संघटना यांच्या अथक परिश्रमाचे फलित आहे.

शिष्यवृत्तीचे सुसंगत नियोजन

व्हीजन दापोली मुख्य समितीचे अध्यक्ष धनंजय शिरसाट यांनी या यशाचे श्रेय तालुक्‍यात शिष्यवृत्तीचे सुसंगत नियोजन तयार करून तालुका शिक्षणक्षेत्रास भरारी देणारे तसेच निवासी शिबिरात स्वत: दक्ष राहणारे गटशिक्षणाधिकारी संतोष भोसले यांच्यासह व्हीजनचे संकल्पक माजी सभापती राजेश गुजर आदींचे आहे.

हेही वाचा - रत्नागिरीत १० धरणांसाठी आता इमर्जन्सी ऍक्‍शन प्लॅन -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: scholarship exam of zilla parishad in ratnagiri students also passed by merit in dapoli an guhagar