मालवणात शाळांबाबत काय निर्णय झालाय वाचा...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे अहवाल शिक्षण विभागाने मागविले. या पार्श्वभूमीवर गटनेते सुनील घाडीगावकर यांनी आक्रमक होत सद्य:स्थितीत शाळा सुरू करणे धोक्‍याचे ठरेल, अशी भूमिका मांडली.

मालवण (सिंधुदुर्ग) - कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता तूर्तास गणेशोत्सव कालावधीपर्यंत शाळा सुरू केल्या जाणार नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी आज झालेल्या पंचायत समितीच्या बैठकीत स्पष्ट केले. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा बंद आहेत. अनेक शाळेत मुंबईसह परजिल्ह्यातून आलेले क्वारंटाइन आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सव पार्श्वभूमीवर काही दिवस आधीच चाकरमानी गावात येण्याची शक्‍यता आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे अहवाल शिक्षण विभागाने मागविले. या पार्श्वभूमीवर गटनेते सुनील घाडीगावकर यांनी आक्रमक होत सद्य:स्थितीत शाळा सुरू करणे धोक्‍याचे ठरेल, अशी भूमिका मांडली. यावर उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सद्य:स्थितीत प्राथमिक, माध्यमिक कोणत्याही शाळा सुरू केल्या जाणार नसल्याचे स्पष्ट केले. 

येथील पंचायत समितीची सभा छत्रपती संभाजीराजे सभागृहात सभापती अजिंक्‍य पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती राजू परुळेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, सहायक गटविकास अधिकारी श्‍याम चव्हाण, जिल्हा कृषी अधिकारी यासह गटनेते सुनील घाडीगावकर, सोनाली कोदे, मनीषा वराडकर, अशोक बागवे, विनोद आळवे, गायत्री ठाकूर, सागरिका लाड, मधुरा चोपडेकर, निधी मुणगेकर या सदस्यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सामाजिक अंतर ठेवून सभा पार पडली. 

ओवळीये वायंगणीवाडी येथे बांधलेले पूल अत्यंत दर्जाहीन असून, चुकीच्या पद्धतीने काम झाले आहे. त्याचे पुढे काय झाले? असा प्रश्न श्री. घाडीगावकर यांनी उपस्थित केला. यावर पुलाचे काम चुकीच्या पद्धतीने झाले असल्याचे प्राथमिक तपासणीत दिसून आले आहे. त्यात बदल करण्याच्या सूचना ठेकेदारास दिल्या आहेत, असे बांधकाम अभियंता श्री. दाणे यांनी स्पष्ट केले. 

झाडांचा गाजला मुद्दा 
कांदळगाव रस्ता मार्गावरील खड्डे, बुजलेली गटारे, रस्त्यावर येणारे पाणी, वाढलेली झाडी याबाबत सोनाली कोदे आक्रमक झाल्या. वारंवार सांगूनही बांधकाम विभाग काम करत नसेल तर वरिष्ठांकडे तक्रार करावी लागेल. तत्काळ काम न झाल्यास पुढील भूमिका घेऊ, असे कोदे यांनी स्पष्ट केले. मसुरे मार्गावर अनेक ठिकाणी झाडे सुकली आहेत. काही झाडे धोकादायक स्थितीत आहेत ती हटवावीत, अशी मागणी गायत्री ठाकूर यांनी केली. सभापती अजिंक्‍य पाताडे यांनी बांधकाम अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. 

विविध समस्यांवर चर्चा 
सोनाली कोदे यांनी कोळंब, सर्जेकोट, रेवंडी किनारी धूपप्रतिबंधक बंधारा व्हावा, अशी मागणी पतन अधिकाऱ्यांकडे केली. अशोक बागवे यांनी मतदारसंघात झालेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना रस्ता कामाबाबत नाराजी व्यक्त केली. रस्त्यावरील खड्डे, गटारांच्या समस्यांवर मार्ग काढण्याची मागणी केली. मधुरा चोपडेकर यांनीही तारकर्ली मार्गाचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली. घाडीगावकर, लाड यांनी बंद दूरध्वनी, खंडित होणाऱ्या बीएसएनएल सेवेबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच खतांच्या तुटवड्याबाबतही चर्चा झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: school issue miting malvan panchayat samiti konkan sindhudurg