भारीच! स्वातंत्र्यपूर्व काळापासून मूर्तीकलेचा वारसा, गुजरातमध्येही झेंडा 

अजय सावंत
Saturday, 22 August 2020

निसर्गाच्या सानिध्यात असलेले चेंदवण (ता.कुडाळ) आपल्या विविध वैशिष्ट्‌यांनी परिपूर्ण आहे. सिनेसृष्टी नाट्यसृष्टीतील अनेक कलाकार या लाल मातीतून होऊन गेले. त्यांचा वारसा अनेक कलाकार जोपासत आहेत.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - स्वातंत्र्यपूर्व काळापासून चेंदवण येथील गणेश मूर्ती कार्यशाळा चालविणाऱ्या (कै.) आप्पा नाईक यांच्या कलेचा वारसा आजतागायत नाईक कुटुंब चालवित आहेत. विशेष म्हणजे या घराण्याने अहमदाबाद (गुजरात) येथेही गेले 45 ते 50 वर्ष गणेशमूर्ती साकारल्याने आपल्या कलेचा झेंडा याठिकाणी रोवला आहे. 

वाचा - अनाथांच्या नाथा तुज नमो  ; देवरुखात या दहा मुली साजरा करणार दिड दिवसांचा गणेशोत्सव 

निसर्गाच्या सानिध्यात असलेले चेंदवण (ता.कुडाळ) आपल्या विविध वैशिष्ट्‌यांनी परिपूर्ण आहे. सिनेसृष्टी नाट्यसृष्टीतील अनेक कलाकार या लाल मातीतून होऊन गेले. त्यांचा वारसा अनेक कलाकार जोपासत आहेत. चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ यांच्या माध्यमातून दशावतार लोककला याठिकाणी जोपासली जात असताना या मंडळाचे मालक व माजी सरपंच उद्योजक देवेंद्र नाईक हे गणेशमूर्ती कलाकार सुद्धा आहेत.

श्री. नाईक राजकीय क्षेत्रात वाटचाल करीत असतानाच एक दशावतार नाट्य मंडळ सांभाळत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या नाईक घराण्याची गणेश कार्यशाळा आजोबांच्या कारकिर्दीत नावाजलेली होती. पंचक्रोशीत आप्पा नाईक हेच गणेश मुर्तीकर असल्याने त्यावेळी मोठ्या प्रमाणात गणेशमुर्त्या बनविल्या जात. आता वाडीवाडीत गणेश कार्यशाळा झाल्याने नाईक घराणे आजोबांच्या कलेचा वारसा जोपासत आहेत. यामध्ये देवेंद्र नाईकांसह त्यांचे काका गुंडू राजाराम नाईक, बंधू रविंद्र नाईक, प्रदीप नाईक यांच्यासह अहमदाबाद येथील भाऊ विजय व्यंकटेश नाईक हे या गणेशमूर्ती साकारण्याचे काम करीत आहेत. 

हेही वाचा - 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंपाउंडरचे ऐकू नये'

कार्यशाळेबाबत देवेंद्र नाईक म्हणाले, ""माझे आजोबा कै. आप्पा नाईक हे सत्तरहुन अधिक वर्षापूर्वी कार्यशाळेत गणेशमूर्ती साकारत होते. आजोबांनी जोपासलेली ही कार्यशाळा पुढे अविरत सुरू ठेवावी या उद्देशाने काका, सर्व बंधूंनी गणेश कार्यशाळा अविरत सुरू ठेवली आहे. 

अहमदाबादमध्ये काम 
देवेंद्र नाईक यांचे बंधू विजय नाईक यांनी गेली 45 वर्षे अहमदाबादमध्ये गणेशमूर्ती कार्यशाळा सुरू ठेवली आहे. या शाळेमध्ये गणेशभक्त मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तीची मागणी असते. 

नाईक घराणे हे गणेशमूर्ती साकारण्याची पारंपरिक कला जोपासत आहेत. नोकरी इतर व्यवसायात कार्यरत असले तरी या घराण्याला गणेश कार्यशाळेत येऊन श्रींची मूर्ती करावीच लागते. 
- देवेंद्र नाईक, गणेशमूर्तीकार तथा माजी सरपंच 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sculptor at Chendwan konkan sindhudurg