रत्नागिरीत मुर्तीकलेचा वारसा नसणारा कुंभार

राजेंद्र बाईत
Tuesday, 11 August 2020

मूर्तीकलेचा कोणताही वारसा नसताना त्यांनी स्वतःमध्ये विकसित केलेल्या मुर्ती कौशल्याचे गणेशभक्तांकडून कौतुक केले जात आहे

राजापूर : शहरा जवळ असलेल्या शीळ येथील रिक्षा व्यवसायिक योगेश दत्ताराम बाईत मागील नऊ वर्षापासून गणेशमुर्त्या तयार करत आहे. मुर्तीकलेची आवड आणि अंगीभूत असलेल्या मुर्तीकलेला त्याने व्यवसायिकतेची जोड दिली आहे. रिक्षाच्या स्टेअरींगवरून नियमित फिरणारी हाताची बोटे सध्या गणेशमुर्त्यांना आकार देताना दिसत आहेत. मूर्तीकलेचा कोणताही वारसा नसताना त्यांनी स्वतःमध्ये विकसित केलेल्या मुर्ती कौशल्याचे गणेशभक्तांकडून कौतुक केले जात आहे.

हेही वाचा - प्रशासनाच्या हातावर तुरी; होम काॅरंटाईन कुटुंबांचा असाही उपद्व्याप..

शीळ येथील बाईत हे मागील अनेक वर्षापासून अर्थाजनासाठी रिक्षा व्यवसाय करतात. ते रिक्षा व्यवसायिक असले तरी, त्यांच्यामध्ये उत्कृष्ठ मूर्तीकार दडलेला आहे. हसतमुख व्यक्तीमत्व असलेले बाईत यांना लहानपणापासून चित्रकला आणि मुर्तीकलेची आवड आहे. शाळेमध्ये असताना त्यांनी कार्यानुभव विषयांतर्गंत वारूळाच्या मातीचा वापर करून हाताने गणेशमुर्ती घडविली होती. यातून त्यांनी शालेय स्तरावर अंगभूत असलेली चित्रकला आणि मुर्तीकला कौशल्याची छाप पाडली होती. त्याचे त्यावेळी सगळ्यांकडून कौतुकही झाले होते. याच कौशल्याला त्यांनी गेल्या नऊ वर्षापासून व्यवसायिकतेची जोड दिली आहे.

मातीला योग्यप्रकारे आकार देत ते घरी असलेल्या कारखान्यामध्ये गणेशमुर्त्या घडवित आहेत. त्यामध्ये एक ते चार फुटापर्यंत उंची असलेल्या विविध प्रकारच्या आणि विविध रूपातील आकर्षक मुर्त्या तयार करतात. सुरूवातीला त्यांनी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या काही गणेश मुर्त्या प्रोयोगिक तत्वावर बनविल्या होत्या. मात्र, मुर्त्या घडविण्याचे काम आणि त्याच्या रंगसंगतीतील वाखाणण्याजोग्या कौशल्याने प्रभावित होवून गणेशभक्तांकडून त्यांच्या मुर्त्यांना मागणी वाढू लागली. त्यामुळे गणेश मुर्त्यांची संख्याही वाढली आहे. 

हेही वाचा - आंदोलने झाली, आश्वासने मिळाली, तरीही दुर्लक्षच! काय आहे हेवाळेची व्यथा? 

शीळ गावासह विखारेगोठणे आणि परिसरातील गावांमध्ये त्यांनी घडविलेल्या मुर्त्या गणेशोत्सवामध्ये घरोघरी विराजमान होतात. रिक्षा व्यवसायिक असलेले योगेश उत्कृष्ठ ढोलकीवादक आहेत. कोकणातील लोककला म्हणून ओळखल्या जात असलेल्या जाकडी नृत्यामध्ये ढोलकीपटू म्हणून त्यांनी नाव कमविले आहे. केवळ आवडीतून जोपासल्या जात असलेल्या व्यवसायाला वडील दत्ताराम बाईत आणि दोन्ही बंधू यांच्यासह कुटुंबियांचे पाठबळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sculpture yogesh bait carving a ganesh murti without any heritage in ratnagiri