
हिवाळ्यामध्ये विविधांगी देशी-विदेशी पक्षी कोकण परिसरामंध्ये स्थलांतरित होतात. त्यामध्ये आकर्षक दिसणाऱ्या छोट्या चणीच्या सी गल, फ्लोमिंगो, काही गरुड प्रजातीचे पक्षी आदींचा समावेश आहे.
राजापूर ( रत्नागिरी ) - अवकाळी पाऊस, चक्रीवादळ आणि त्यातून बदलेल्या वातावरणाचा फटका बसून दिवाळीतील थंडीच्या हंगामातील स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन लांबणीवर पडले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांचे कोकण किनारपट्टीवर झालेले आगमन सुखावणारे आहे. छोट्या चणीच्या सी गलसह अन्य पक्ष्यांचा समावेश आहे.पक्ष्यांच्या किलबिलाटाने पाणथळ भाग, पाणवठ्यांसह समुद्रकिनारे गजबजू लागले आहेत. दरवर्षीच्या तुलनेमध्ये पक्ष्यांची संख्या घटली आहे.
हिवाळ्यामध्ये विविधांगी देशी-विदेशी पक्षी कोकण परिसरामंध्ये स्थलांतरित होतात. त्यामध्ये आकर्षक दिसणाऱ्या छोट्या चणीच्या सी गल, फ्लोमिंगो, काही गरुड प्रजातीचे पक्षी आदींचा समावेश आहे. कोकण परिसरातील बदललेल्या वातावरणामुळे स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन यावर्षी लांबणीवर पडले होते. स्थलांतरासाठी प्रवासाला निघालेले हे पक्षी चक्रीवादळ वा अन्य वादळामुळे काही प्रदेशांमध्ये अडकून पडल्याचा अंदाज वर्तविला जात होता. मात्र आता कोकण किनारपट्टीवर पक्षीप्रेमींसह निसर्गप्रेमींचे आकर्षण असलेल्या सीगलचे आगमन झाले आहे.
समुद्रकिनाऱ्यावर थव्याने बसण्यासह सीगल पक्षी मुक्तपणे अवकाशामध्ये सैर करतानाचे मनमोहक चित्र पाहायला मिळत आहे. सीगल पक्ष्यासह परदेशी पक्ष्यांची छबी कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासह त्यांची सैर अनुभवण्यासाठी पक्षीप्रेमींची पावले आपसूकच समुद्रकिनाऱ्याकडे वळत आहेत.
ऑक्टोबरमध्ये विविध देशी-परदेशी पक्ष्यांचे पाणथळ भाग, पाणवठे आणि समुद्रकिनाऱ्यावर आगमन होते. मात्र यावर्षी लांबलेला पाऊस, वादळे यामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन लांबले. काही दिवसांपूर्वी कोकण किनारपट्टीवर सीगल पक्ष्यांचे आगमन सुखावह आहे. हळूहळू अन्य पक्ष्यांचेही आगमन होईल, अशी आशा आहे.
- धनंजय मराठे, पक्षीप्रेमी