esakal | फोलपणा हाती, पितळ उघडे; कोरोनाची दुसरी लाट तरी व्यवस्थेचा बोजवारा

बोलून बातमी शोधा

फोलपणा हाती, पितळ उघडे; कोरोनाची दुसरी लाट तरी व्यवस्थेचा बोजवारा
फोलपणा हाती, पितळ उघडे; कोरोनाची दुसरी लाट तरी व्यवस्थेचा बोजवारा
sakal_logo
By
मुझफ्फर खान

वर्षापूर्वी कोरो संसर्ग पसरायला सुरुवात झाली, तेव्हा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मोठा गाजावाजा करून कोरोनावर मात करण्याचे जाहीर केले. नेत्यांची विधाने सुरू झाली. वर्षभर या आश्वासनांचा पाऊस पडत राहिला. कोरोनाची पहिली लाट ओसरली व दुसरीच्या धोक्‍याकडे दुर्लक्ष करत, नेते त्यांचीच विधाने विसरायला लागले. आता दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा बसल्यावर साऱ्यांचे पितळ उघडे पडले. तरीही नेत्यांचे दौरे आणि आश्‍वासने सुरूच आहे. कोरोना काळातील जिल्हा आणि अपुऱ्या शासकीय यंत्रणेची दशा दाखवणारी मालिका...

चिपळूण : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. मात्र, एक वर्षाचा कालावधी मिळूनसुद्धा कोणत्याही ठोस उपायोजना झालेल्या नाहीत. नेत्यांचे नुसतेच दौरे, आढावा बैठका आणि आश्‍वासनाचा पाऊस सुरू आहे. कोकणातील लोकप्रतिनिधींनी कोरोना काळाच्या सुरुवातीला केलेल्या घोषणा आठवल्या आणि त्यातील काय पूर्णत्वास गेले, याची तपासणी केली तर त्या सर्वांचा फोलपणा लगेच लक्षात येतो.

सरकारी वा खाजगी रुग्णालयात जागा नाही, बाजारात रेमडेसिवीर उपलब्ध नाही. ऑक्‍सिजनसाठी मारामार सुरूच. चाचणी करायची असेल तर दोन दिवसाची प्रतीक्षा करावी लागते. लसीकरणाची ओरड कायम आहे. मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील वर्षी याच काळात टाळेबंदी सुरू असताना जिल्ह्यात जंबो कोविड रुग्णालय उभारण्याची घोषणा झाली. जिल्हा रूग्णालयासह इतर रुग्णालयात खाटा वाढवू, आरोग्य खात्यातील पदे भरू, डॉक्‍टर्स नेमू, असे सांगण्यात आले. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात एकही जम्बो रुग्णालय उभे झाले नाही. खाटांची संख्या काही ठिकाणी थोडीफार वाढली. पण आरोग्य कर्मचारी व डॉक्‍टर्स होते तेवढेच. लाट ओसरल्यानंतर जणू काही घडलेच नाही, अशा थाटात प्रत्येक नेते वागू लागले. आता दुसरी लाट सुरू झाल्याबरोबर हेच नेते पुन्हा त्याच घोषणा करू लागले आहेत.

"रत्नागिरी जिल्ह्यात 131 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. सर्वच आरोग्य केंद्रात डॉक्‍टर्स उपलब्ध करण्यात आले आहेत. 50 टक्के डॉक्‍टर्स जिल्हा परिषदेच्या खर्चातून भरण्यात आले आहेत. सर्व तालुक्‍यांमध्ये कोविड सेंटर सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शक्‍य त्या उपायोजना सुरू आहेत."

- विक्रांत जाधव, अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा परिषद