कोकणात तीन दिवसांत 'या' नद्यांनी गाठली धोक्याची पातळी

राजेंद्र बाईत
Monday, 17 August 2020

शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडण्याची या महिन्यातील दुसरी वेळ आहे 

राजापूर : गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार कोसळणार्‍या पावसामुळे तालुक्यातून वाहणार्‍या अर्जुना-कोदवली नद्यांना पूर आला आहे. परिणामी पुराचे पाणी जवाहर चौकात घुसले. जवाहरचौक काही तासांमध्ये सुमारे दोन फुट पाण्याखाली गेला होता. पावसाच्या जोरामुळे व्यापार्‍यांच्या मनामध्ये धडकी भरली. संभाव्य परिस्थिती लक्षात घेत व्यापारी सतर्क झाल्याने फारसे नुकसान झालेले नाही. शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडण्याची या महिन्यातील दुसरी वेळ आहे.

हेही वाचा - ‘त्या’ एका  मेसेजमुळे मुख्य बाजारपेठेकडे ग्राहकांनी फिरवली पाठ..

तालुक्याच्या ग्रामीण भागातील शीळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव रस्ता पाण्याखाली गेल्याने त्या मार्गावरील वाहतूक दिवसभर ठप्प होती. अर्जुना-कोदवली नद्यांच्या काठावरील शीळ, गोठणेदोनिवडे, चिखलगाव, उन्हाळे आदी गावांमधील भातशेती पाण्याखाली गेली होती. रविवारी रात्रीपासून तालुक्यामध्ये पावसाने जोर धरला आहे. रविवारी रात्री जवाहर चौकातील टपर्‍या पाण्याखाली गेल्या होत्या.

रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा जोर सोमवारी सकाळीही सुरूच होता. सकाळी 10 च्या सुमारास अर्जुना-कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. पुराच्या पाण्याने जवाहरचौकात धडक दिली. सद्यस्थितीमध्ये बाजारपेठेमध्ये पुराचे पाणी घुसले नसली तरी कोदवली नदीच्या काठावरील शिवाजी पथ मार्गावरील टपर्‍या, दुकाने, कोंढेतड आणि वैशंपायन पूल, बंदधक्का आणि वरचीपेठ परिसर पाण्याखाली गेला आहे. 

हेही वाचा -  पारंपरिक मत्स्य व्यावसायिक महिलांचे शासनाला साकडे...

पुराचे पाणी वाढण्याचा पूर्वअंदाज आणि अनुभवामुळे व्यापारी आधीच सतर्क झाले होते. पूरस्थितीमुळे शहरासह परिसरातील जनजीवन विस्कळित झाले. पूरस्थितीची नगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी पाहणी केली. या वेळी उपनगराध्यक्ष संजय ओगले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बंड्या बाकाळकर, भाजपचे नगरसेवक गोविंद चव्हाण आदी उपस्थित होते. त्यांनी सार्‍यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. 

संपादन -  स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: second time flood situation arjuna and kodavali river in ratnagiri