प्रस्ताव डावलल्याने बचतगटाचे उपोषण

विनोद दळवी 
Thursday, 29 October 2020

उपोषणस्थळी जिल्हा परिषद सत्ताधारी गटनेते देसाई यांनी भेट देवून वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी मालवण उपसभापती परुळेकर, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र चव्हाण, पंचायत समिती सदस्य सुनील घाडीगांवकर, बाळा लाड, प्रवीण घाडीगांवकर, अभी लाड, अमित लाड आदी उपस्थित होते. 

ओरोस (सिंधुदुर्ग) - किर्लोस आंबवणे (ता.मालवण) येथील साई स्वयंसहाय्यता महिला बचतगटाचा परिपूर्ण व निकषात प्रस्ताव असतानाही या बचतगटाला डावलून जिल्हा पुरवठा विभागाने तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण असलेल्या दुसऱ्या बचतगटाच्या प्रस्तावाला रास्त धान्य दुकानाची परवानगी दिली. याविरोधात न्याय मागण्यासाठी साई महिला बचतगटाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडले. 

यावेळी जिल्हा परिषद सत्ताधारी गटनेते रणजीत देसाई, मालवण उपसभापती राजू परुळेकर यांनी भेट दिली. यावेळी साई महिलागटाच्या संजना लाड, वैशाली लाड, अमृता लाड, समीक्षा लाड, सुवर्णा लाड, शोभा लाड, सावित्री लाड, जयश्री लाड, लता लाड, सुरेखा लाड आदी पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. उपोषणस्थळी जिल्हा परिषद सत्ताधारी गटनेते देसाई यांनी भेट देवून वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी मालवण उपसभापती परुळेकर, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र चव्हाण, पंचायत समिती सदस्य सुनील घाडीगांवकर, बाळा लाड, प्रवीण घाडीगांवकर, अभी लाड, अमित लाड आदी उपस्थित होते. 

किर्लोस आंबवणे येथील रास्त धान्य दुकानाचा परवाना देताना झालेल्या अन्यायाविरोधात न्याय मिळण्यासाठी उपोषण छेडण्यात आले. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की किर्लोस आंबवणे गावात रास्त धान्य दुकान नव्हते. त्यामुळे धान्य व केरोसिन विक्री परवाना मंजूरीसाठी 11 ऑगस्टला जाहीरात प्रसिद्ध केली होती. त्या अनुषंगाने परिपूर्ण प्रस्ताव सादर केला होता. याच्या निश्‍चितीसाठी 20 ऑगस्टला झालेल्या बैठकीत साई बचतगटाची आर्थिक रक्कम 60 हजार होती. ज्या बचतगटाला परवाना दिला आहे, त्यांची 28 हजार रुपये बचत होती. त्यामुळे तुलनेत आमचा बचतगट आर्थिक सक्षम होता. तरीही अन्याय झाला. 

अपिल करा ः गीते 
उपोषणस्थळी जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी ही निवड करण्यासाठी शासनाची समिती असते. त्या समितीने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय बदलण्याचे अधिकार आपल्याला नाहीत. आपण या विरोधात आयुक्त स्तरावर अपील करावे, असे सांगितले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Self-help group agitation at Oros konkan sindhudurg