गटबाजी शमवण्यात सेनेची ताकद खर्ची

राजेश शेळके - सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

रत्नागिरी - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले; मात्र सर्वच राजकीय पक्षातील अनेक इच्छुकांनी आधीच मोर्चेबांधणी केली आहे. रत्नागिरी तालुक्‍यात १० गट आणि २० गणांसाठी निवडणूक होणार आहे. तालुक्‍यात शिवसेना सर्वांत मोठा पक्ष असल्याने गट आणि गणांवर त्यांचा दबदबा कायम आहे.

रत्नागिरी - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले; मात्र सर्वच राजकीय पक्षातील अनेक इच्छुकांनी आधीच मोर्चेबांधणी केली आहे. रत्नागिरी तालुक्‍यात १० गट आणि २० गणांसाठी निवडणूक होणार आहे. तालुक्‍यात शिवसेना सर्वांत मोठा पक्ष असल्याने गट आणि गणांवर त्यांचा दबदबा कायम आहे.

सेनेत इच्छुकांची मोठी गर्दी असल्याने कोणाला थोपवायचे आणि कोणाला उमेदवारी द्यायची यावर नेत्यांचा कस लागणार आहे. विरोधकांपेक्षा पक्षांतर्गत गटबाजी शमवण्यावरच शिवसेनेची जास्त ताकद खर्ची पडत असल्याचे दिसत आहे. त्यात नव्या-जुन्यांचा काहीसा पगडा अजूनही आहे. सेनेशी राजकीय चार हात करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होती; परंतु तालुक्‍यात ती नावाला उरली आहे.

काँग्रेसचीदेखील तीच अवस्था आहे. भाजपने मात्र सत्तेच्या जोरावर पाय पसरण्यासाठी आणि नाराजांना जाळ्यात ओढण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. तालुक्‍यात ९४ ग्रामपंचायतींपैकी ८० ते ९० टक्के ग्रामपंचायती शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे सेना हा तळागाळात रुजलेला पक्ष आहे. त्यात भर पडली ती आमदार उदय सामंत यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केल्याची. त्यामुळे सेनेची पाचही बोटे तुपात आहेत. सामंत यांनी आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सेनेत आणले. त्यांचा विश्‍वास सार्थ करण्यासाठी अनेकांचे पुनर्वसन करून सेनेत पदे दिली. जुन्या नव्याचा निकष सेनेत नसला तरी तो फरक मात्र अनेक ठिकाणी दिसून येतो. त्यावर काहीशी नाराजी आहे. जिल्हा परिषद ८ गटांचा विचार केला, तर शिवसेनेकडे ५, भाजप २ आणि राष्ट्रवादी १ असे पक्षीय बलाबल आहे. १६ पंचायत समिती गणांमध्ये शिवसेना १०, भाजप ४ राष्ट्रवादी २ असे बलाबल आहे. 

गट आणि गणांची फेररचना झाली असून तालुक्‍यात  २ गट वाढले आहेत. त्यामुळे ८ चे १० गट झाले, तर पंचायत समितीचे १६ ऐवजी २० गण झाले. या फेरबदलामुळे आणि आरक्षणामुळे सर्वांत ताप झाला तो शिवसेनेलाच. याच पक्षात जास्त खलबते शिजत आहेत. अनेक इच्छुकांनी वर्णी लागण्यासाठी कामाला सुरवात केली आहे. वरिष्ठांची मर्जी मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे. गटात-गणात चांगले वजन असलेल्यांना आरक्षणाचा फाटका बसला आहे. त्यांचे पुनर्वसन आणि आधीपासून काम करणाऱ्या तेथील जुन्या नेत्याची समजूत काढण्याचे काम कठीण आहे. काही ठिकाणी नाराजीचे सूर उमटले आहेत. केंद्र आणि राज्यात सत्तेत असल्यामुळे भाजप रत्नागिरी तालुक्‍यात मोट बांधण्याचा जोरदार प्रयत्न करीत आहे. भाजपची ताकद जेमतेम असल्याने नाराजांना पक्षात घेण्यासाठी जाळे टाकलेले आहे. प्रभावी उमेदवार मिळणेदेखील अनेक ठिकाणी मुश्‍कील आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रस तालुक्‍यात प्रभावहीन झाली आहे. दोन्ही पक्षांचे अस्तित्व नावापुरतेच काही पॉकेट्‌समध्ये आहे. या परिस्थितीत त्यांच्यावरही उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. 

जिल्हा परिषद गट
वाटद, करबुडे, कोतवडे, शिरगाव, हातखंबा, नाचणे, गोळप, पावस, मिरजोळे, हरचिरी,

पंचायत समिती गण
वाटद, मालगुंड, करबुडे, देऊड, कोतवडे, कासारवेली, शिरगाव, मिरजोळे, हातखंबा, पाली, नाचणे, कर्ला, गोळप, हरचिरी, पावस आणि गावखडी

Web Title: Sena strength spent