तपासणीसाठी आले पायी चालत अन् `ते` निघाले...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

पागांरी खांबेवाडीतील व्यक्ती (वय 60) व त्यांचा 28 वर्षांचा मुलगा 13 मे रोजी प्रतिक्षा नगर, सायन (पश्‍चिम) मुंबईहून खासगी टेम्पोने रात्री उशिरा चिपळूणला पोचले. तेथून खासगी वाहनाने ते 14 मे रोजी सकाळी शृंगारतळीला आले.

गुहागर ( रत्नागिरी ) - तालुक्‍यातील कोरोना रुग्णांची संख्या आज पुन्हा एकाने वाढली. पांगारी खांबेवाडीत मुंबईतून आलेल्या व्यक्तीचा स्वॅब अहवाल 20 मे रोजी पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीला वेळणेश्वरमधील कोविड केअर सेंटरला ठेवण्यात आले आहे. मुंबईतून आल्यावर तपासणी झाली पाहिजे म्हणून बाप-लेकांनी श्रृंगारतळी ते पांगारी व्हाया ग्रामीण रुग्णालय गुहागर असा तब्बल 28 कि. मी. प्रवास पायी केला होता. 

पागांरी खांबेवाडीतील व्यक्ती (वय 60) व त्यांचा 28 वर्षांचा मुलगा 13 मे रोजी प्रतिक्षा नगर, सायन (पश्‍चिम) मुंबईहून खासगी टेम्पोने रात्री उशिरा चिपळूणला पोचले. तेथून खासगी वाहनाने ते 14 मे रोजी सकाळी शृंगारतळीला आले. शृंगारतळीत कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याने बापलेक 10 कि. मी. चा प्रवास पायी करून गुहागरमधील ग्रामीण रुग्णालयात पोचले. तेथे होम क्वारंटाईन केल्यानंतर पुन्हा ते 18 कि. मी. अंतर चालत वेळंब पांगारी खांबेवाडीला घरी पोचले. 15 मे रोजी ताप आल्याने 60 वर्षीय व्यक्ती वाडीतील रिक्षाचालकाला घेऊन ग्रामीण रुग्णालय गुहागर येथे आली. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दोन दिवसांच्या गोळ्या दिल्या. औषधे घेऊनही ताप उतरला नाही. त्यामुळे ती व्यक्ती आपल्या मोठ्या मुलासोबत मोटरसायकलने ग्रामीण रुग्णालय गुहागर येथे आली.

या वेळी मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला आंतररुग्ण विभागात ठेवून उपचार सुरू केले. याबाबतचा अहवाल जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोचल्यानंतर त्या व्यक्तीचा स्वॅब 19 मे रोजी तपासण्यासाठी पाठविण्यात आला. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर 20 मे रोजी रात्री त्यांना वेळणेश्वर येथील कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे. 

या व्यक्तीसोबत प्रवास करणाऱ्या त्यांच्या मुलालाही वेळणेश्वर येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. वाडीतील रिक्षा चालकालाही सावधगिरीचा उपाय म्हणून विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. या व्यक्तीची पत्नी आणि धाकटा मुलगा यांना पांगारी खांबेवाडीत होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Serviceman From Pangari Reported As Corona Positive