मुंबईतील तरुणांची कमाई ; सात एकर जमीनीवर घेतले तीन टनाचे उत्पादन

राजेंद्र बाईत
Saturday, 24 October 2020

शेतीकडे त्यांचा पाहण्याचा असलेला सकारात्मक दृष्टिकोन आणि जिद्द वाखाणण्यासारखी आहे.

राजापूर (रत्नागिरी) : तालुक्‍यातील गोठणेदोनिवडे येथील काही तरुणांनी अर्जुना नदीच्या काठावरील पडीक जमीन ओलिताखाली आणली आहे. उन्हाळ्यामध्ये भुईमूग लागवड तर पावसाळ्यामध्ये भातशेती करून दुबार पीक घेतले आहे. या उपक्रमाला पूर आणि लॉकडाउनचा आर्थिकदृष्ट्या तडाखा बसला. तरी शेतीकडे त्यांचा पाहण्याचा असलेला सकारात्मक दृष्टिकोन आणि जिद्द वाखाणण्यासारखी आहे.

हेही वाचा -  विद्यार्थ्यांच्या यशासाठी शिक्षकाने सोडले घर -

गोठणेदोनिवडे येथील संतोष लोळगे, विजय हातणकर, दीपक हातणकर, प्रसाद हातणकर, उमेश हातणकर, संदीप मांडवकर, संतोष मांडवकर, अमोल पाडावे, नारायण मिरजोळकर या तरुणांनी मुंबईतील नोकरी सांभाळून गावातील पडीक जमीन ओलिताखाली आणण्याचा निर्धार केला. ‘राजापूर ॲग्रो ग्रामलक्ष्मी शेतकरी गट’ गठित करून त्याद्वारे त्यांनी अर्जुना नदीच्या काठावरील उन्हाळ्यामध्ये पडीक असलेली सुमारे सात एकर जागा भाडेतत्त्वावर घेतली. त्यामध्ये भुईमूग लागवडीसह भाजीपाला आणि अन्य पिके घेतली. त्यातून सुमारे तीन टन उत्पादन मिळाले.

लॉकडाउनमुळे बाजारपेठ न मिळाल्याने आर्थिक नुकसान झाले. तरीही त्यांनी त्याच मळ्यामध्ये पावसाळ्यात भातशेती केली. लाल भातासह भाताच्या अन्य संकरित बियाण्यांचा वापर केला आहे. विलास पारावे, सुधीर चिविलकर यांच्यासह कृषी अधिकारी म्हस्के, तांदळे, शेवडे यांचे मार्गदर्शन तर नेरके येथील सुनील राघव यांचे सहकार्य लाभले.

गडी माणसांसोबत स्वतः शेतामध्ये राबून त्यांनी ही शेती केली. पिकही चांगले आल्याने या तरुणांचा हुरुप वाढला. मात्र, पुन्हा एकदा पुराचा तडाखा सहन करावा लागला. गत आठवड्यामध्ये अर्जुना नदीला आलेले पाणी आणि रानडुकरांनीही शेतीमध्ये घुसून नुकसान झाले. तरीही प्रयोग कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे.

हेही वाचा - निराधारात परमेश्वर पाहणाऱ्या पिंगुळीतील दुर्गा

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seven ekar land on crop of vegetables and other crop production received by youth in kokan 3 ton in ratnagiri