काळ आला होता पण वेळ आली नव्हती ; नौका बुडाली मात्र सातजण वाचले

राधेश लिंगायत
Monday, 7 September 2020

वादळामुळे भरकटू लागल्यावर या बोटीवरील 7 खलाशांना इतर बोटींवरील खलाशांनी आपल्या बोटीवर घेऊन त्यांचा जीव वाचवला.

दाभोळ : आज पहाटे 3 ते 3.30 वाजण्याच्या सुमारास सुटलेल्या वाऱ्यामुळे आणि अचानक आलेल्या वादळी पावसामुळे दापोली तालुक्यातील हर्णे बंदरात उभी असलेल्या 'परमेश्वरी' या मासेमारी बोटीच्या समुद्रात सोडलेल्या नांगराची दोरी तुटून ही बोट वादळात भरकटली. नांगर लागल्याने बोटीला भगदाड पडले आणि पाणी शिरून या बोटीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा - पार्थिव दफन प्रकरणाचा चेंडू प्रांताधिकाऱ्यांच्या कोर्टात, लवकरच निर्णय शक्य

या बाबत माहिती देताना पाजपंढरी येथील मच्छीमार नेते पांडुरंग पावसे म्हणाले की, महेश रघुवीर यांच्या मालकीची 6 सिलेंडर असलेली परमेश्वरी ही मासेमारी बोट आज पहाटे मच्छीमारीसाठी समुद्रात जाणार होती. त्यासाठी बोटीवर डिझेल, बर्फ, पाणी, अन्नधान्य भरून ठेवण्यात आले होते. सर्व तयारी करून पहाटे मासेमारीला जायचे म्हणून बोटीवरील 7 खलाशी झोपी गेले. पहाटे 3 ते 3.30 वाजण्याच्या दरम्यान सोसाट्याचा वारा सुटला आणि वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. यात परमेश्वरी बोटीचा नांगराला बांधलेला दोर तूटला आणि ही बोट वाऱ्याच्या वेगामुळे भरकटली. यातच या बोटीला पाण्यात असलेला नांगर लागल्यामुळे बोटीला भगदाड पडले व बोटीत पाणी शिरले. पाणी शिरल्यामुळे बोटीतील सर्व साधनसामग्री भिजून गेली आहे. या बोटीची किंमत 50 लाख रुपये आहे.

हेही वाचा - ब्रिटीशकालीन काम अन् आताच्या कामाची होतेय तुलना, कारण...

यापूर्वी निसर्ग वादळ आले तेव्हा प्रशासनाने त्याची कल्पना मच्छीमार बांधवाना दिली होती. मात्र कालच्या वादळाची माहिती अगोदर  मिळाली नाही. त्यातच हर्णे येथील  बंदर सुरक्षित नसल्याने बोटी उभ्या करण्यासाठी सुरक्षित जागा नसल्याने केवळ नशिबावर विश्वास ठेवून मासेमारी करावी लागत आहे. दरम्यान ही मासेमारी बोट वादळामुळे भरकटू लागल्यावर या बोटीवरील 7 खलाशांना इतर बोटींवरील खलाशांनी आपल्या बोटीवर घेऊन त्यांचा जीव वाचवला.

 

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seven fishermen survive in ratnagiri boat destroyed in sea