
-राजेंद्र बाईत
राजापूर: सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पुरातत्व आणि कातळशिल्प संशोधक सतीश लळीत यांनी कोकणातील पहिल्या महापाषाण संस्कृतीकालीन एकाश्मस्तंभ स्मारकांचा शोध लावला आहे. राजापूरातील कुंभवडे येथील श्री गंभीरेश्वर मंदिराजवळ जांभ्या दगडाची सात एकाश्मस्तंभ स्मारके श्री. लळीत यांनी शोधली असून ही स्मारके म्हणजे एकाच दगडातून खोदून काढून उभे केलेले उभे पाषाण आहेत. इसपू 1500 ते 400 वर्षे हा महापाषाण संस्कृतीचा (मेगालिथिक कल्चर) काळ मानला जात असून हा मानवी विकासाच्या वाटचालीतील एक महत्वाचा कालखंड आहे. त्यामुळे श्री. लळीत यांनी शोधलेल्या एकाश्मस्तंभ स्मारकांद्वारे कोकणच्या प्राचीन इतिहासाचा उलगडा होण्यास वा नवा प्रकाशझोत पडण्यास एकप्रकारे मदत होणार आहे.