'राणेंना धोका की राणेंपासून धोका'

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

याठिकाणी पर्यटन वाढीसाठी आवश्‍यक असलेले सहकार्य आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून नक्कीच करू, असेही त्यांनी सांगितले.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्गात राबविण्यात आलेली फलोत्पादन योजना आपल्या संकल्पनेतून तयार झाली. त्यासाठी आवश्‍यक निधी दिला. मात्र, त्यात सातत्य राहण्यासाठी स्थानिक लोकांनी आणि लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केले.

जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास होत आहे. पंचतारांकित हॉटेल उभी राहत असल्याने आता त्याचा फायदा होईल. त्यामुळे याठिकाणी पर्यटन वाढीसाठी आवश्‍यक असलेले सहकार्य आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून नक्कीच करू, असेही त्यांनी सांगितले. गोव्यातून कोल्हापूरच्या दिशेने येताना आंबोली नांगरतास येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला त्यांनी भेट दिली, त्या वेळी त्यांचे कोल्हापुरातील नेत्यांनी स्वागत केले.

यावेळी पवार काही काळ आंबोली येथे थांबले. या वेळी त्याठिकाणी उपस्थित पत्रकारांनी त्यांना प्रश्‍न केले असता त्यांनी ही माहिती दिली. या वेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी जिल्हाध्यक्ष व्हिक्‍टर डान्टस, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, चित्रा बाबर-देसाई, हिदायतुल्ला खान आदी उपस्थित होते. तत्पूर्वी, बांदा येथे त्यांचे ‘राष्ट्रवादी’तर्फे स्वागत करण्यात आले.

हेही वाचा - राज्य शासनाचा निर्णय डावलून तेथे केंद्र शासनाने हस्तक्षेप करणे ही पद्धत योग्य नाही

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक ही महाराष्ट्राला आदर्श अशी बॅंक आहे. तिचा ‘एनपीए’ शून्य असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या कामाचे कौतुक केले. यावेळी पवार यांनी कोल्हापूर, सिंधुदुर्गातील राजकारणाच्या संदर्भात माजी राज्यमंत्री भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे संचालक व्हिक्‍टर डान्टस, तालुकाध्यक्ष दळवी यांच्याशी चर्चा केली. आपण नवीन काही करू शकतो का, याबाबतही त्यांनी माहिती घेतली. या चर्चेत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे विशेष कौतुक केले. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे काम महाराष्ट्राला आदर्श असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

राणेंना धोका की राणेंपासून धोका

राज्य सरकारने भाजपच्या काही नेत्याची सुरक्षा काढल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या जीवाचे बरे वाईट झाल्यास सरकारच जबाबदार राहिल असे म्हटले होते. पण यावर पवार यांनी राणेंपासून धोका का ? असे म्हणत मिश्कील टिपण्णी केली. कुणाला सुरक्षा द्यायची किंवा कुणाला नाही द्यायची ते पोलिस ठरवतील असेही ते म्हणाले. 
 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar said in amboli for the development of konkan fruit in sindhudurg