esakal | दूरदृष्टीच्या शरद पवार यांची कोकणवर मेहरनजर

बोलून बातमी शोधा

sharad pawar Special provision of funds to konkan

शरद पवार यांनी तेव्हा कोकणचा विमानातून दौरा केला होता. या वेळी मोठ्या प्रमाणात पडीक आणि कातळ जमीन त्यांनी पाहिली

दूरदृष्टीच्या शरद पवार यांची कोकणवर मेहरनजर
sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी - राज्याच्या जडणघडणीमध्ये कोकणला महत्त्वाचे आणि आदराचे स्थान आहे. त्याचा पुरस्कार केला तो राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, माजी मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री, केंद्रीय कृषिमंत्री आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व शरद पवार यांनी.

कोकणाच्या दळणवळामध्ये मोठी भर पडली ती कोकण रेल्वेमुळे. मधु दंडवते यांच्या प्रयत्नाबरोबर तत्कालीन रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी शरद पवार यांनी बैठक घेऊन हा प्रकल्प मार्गी लावला. कोकणातील पडीक आणि कातळ जमीन फळबाग लागवडीच्या माध्यमातून फुलवणारे शरद पवारच आहेत. फिनोलेक्स कंपनीच्या माध्यमातून रोजगार निर्माण करणे, पंचायत राज्य व्यवस्थेतून महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 30 टक्के आरक्षण, मिरकरवाडा मत्स्य बंदर, नारळ बोर्डावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा मान पवारांनी राजाभाऊ लिमये यांच्या माध्यमातून कोकणला दिला. दूरदृष्टी असलेल्या या नेत्याची कोकणशीही नाळ जुळली आहे.

शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस. त्या निमित्ताने कोकणच्या झोळीत त्यांनी काय टाकले याचा हा ऊहापोह. कोकणच्या समृद्धीमध्ये दळणवळणाचा मोठा हातभार आहे. कोकण रेल्वेमुळे हे स्पष्ट झाले आहे. मधु दंडवते यांनी त्यासाठी केलेले प्रयत्न अविस्मरणीय आणि वाखाणण्याजोगे आहेत. मात्र याला दुसरी बाजूदेखील आहे. कोकण रेल्वे पूर्णत्वास नेण्यासाठी शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरली. जॉर्ज फर्नांडिस रेल्वेमंत्री असताना पवारांनी त्यांची भेट घेतली. कोकण रेल्वे ज्या-ज्या राज्यातून जाते त्या राज्याच्या मुख्यंत्र्यांना भेटले पाहिजे. केंद्राप्रमाणे त्यासाठी राज्याचा आर्थिक हिस्सा असला पाहिजे, असे त्यांनी मांडले. त्यानुसार केंद्राने महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडूच्या बैठका घेऊन ती मदत मिळवली. म्हणून दर्‍याखोर्‍यातून जाणारा कोकण रेल्वेमार्ग वेगात झाला. यामध्येही लोकसहभाग असावा यासाठी उद्योजक आणि नागरिकांच्या ठेवी मिळवण्याची योजना आणली. गुंतवणूक करणार्‍यांना रेल्वे बोर्डाकडून चांगले व्याज मिळते. ठेवींचा शुभारंभ जॉर्ज फर्नांडिस यांनी केला होता. तेव्हा तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी आपण यामध्ये ठेवी ठेवल्याची आठवण सांगितली.  

शरद पवार यांनी तेव्हा कोकणचा विमानातून दौरा केला होता. या वेळी मोठ्या प्रमाणात पडीक आणि कातळ जमीन त्यांनी पाहिली. त्यामध्ये खोदकाम करून हा संपूर्ण परिसर सुपीक करण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात होती. ती रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून त्यांनी सत्यात उतरवली. 

1990-91 दरम्यान फळबाग लागवडीसाठी त्यांनी शंभर टक्के अनुदानातून रोजगार हमी योजना सुरू केली. पडीक जमीन सुपीक झाली. फळधारणा मोठ्या प्रमाणात झाली. फळप्रक्रिया उद्योग सुरू झाले. अनेक शेतकर्‍यांकडे आर्थिक सुबत्ता आली. मुंबईचे चाकरमानीदेखील फळबाग लागडवडीसाठी आले. या योजनेचा कोकणला मोठा फायदा झाला. 

रोजगार निर्मितीच्यादृष्टाने त्यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले. राजाभाऊ लिमये तेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष होते. त्यांनी उद्योगाच्या दृष्टीने शरद पवार यांच्याशी चर्चा केली होती. त्यांच्या प्रयत्नामुळे 1990 मध्ये फिनोलेक्स इंडस्ट्रीज रनपार येथे आली. फिनोलेक्स उद्योग येथे आल्यानंतर त्यांना कुशल कामगारांची गरज होती. त्यांना इंजिनिअर लागणार असल्याने ते इथेच निर्माण व्हावे, यासाठी इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केले. अनेक उमेदवारांना तिथे शिकता आले. पंचायत राज्य व्यवस्थेमध्ये महिलांना 30 टक्के आरक्षण देणे हे शरद पवार यांच्यामुळे शक्य झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमात त्यामुळे महिलांना सहभागी होता आले. शरद पवार संरक्षणमंत्री असताना महिलांना या दलामध्ये येण्याची संधी त्यांनी दिली. 1992 मध्ये त्यांनी हा निर्णय घेतला. कोकणातील अनेक शैक्षणिक संस्थाना त्यांनी मदत केली. केंद्रीय कृषिमंत्री असताना मिरकरवाडा बंदराला त्यांनी मत्स्य बंदर म्हणून मंजूर दिली. त्यासाठी 74 कोटीचा पहिला टप्पा मंजूर केला. त्याचे काही अंशी काम झाले. त्यांनी कोकणालाही भरभरून दिले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील अनेक पदाधिकार्‍यांना आजही ते नावाने ओळखतात. एवढा दांडगा त्यांचा जनसंपर्क आहे. म्हणून कोकणाशी त्यांचे वेगळे नाते आहे.

हे पण वाचाशिवसैनिकांनो हीच वेळ यांना खाली खेचण्याची


नारळ बोर्डावर आतापर्यंत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा एकही सदस्य नव्हता. मात्र शरद पवार जेव्हा कृषिमंत्री झाले तेव्हा त्यांच्याकडे नारळ बोर्डाची फाईल गेली. पवारांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी दिली. महाराष्ट्र, गुजरातसाठी राज्य केंद्र कार्यालय म्हणून रत्नागिरीत होणार होते. मात्र गुजरातच्या लोकांनाही सोयीचे व्हावे यासाठी ते ठाण्यात घेण्याची मी सूचना केली. नारळ बोर्डाच्या अनेक योजना महाराष्ट्र, गुजरातमध्ये आणल्या. प्रक्रिया उद्योग सुरू झाले. झावळे, करवंटीपर्यंत हे प्रक्रिया उद्योग सुरू झाले. प्रचंड दूरदृष्टी असलेला हा नेता आहे, अशी माहिती राजाभाऊ लिमये यांनी दिली. 

संपादन - धनाजी सुर्वे