खेकडे केवळ तिवरे धरणावर आली का ? - शेखर निकम

मुझफ्फर खान
शुक्रवार, 5 जुलै 2019

चिपळूण -  खेकडे केवळ तिवरे धरणावर आली का ? इतर धरणातही खेकडे आहेत, मग ती धरणे का फुटली नाहीत, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखर निकम यांनी जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली.

चिपळूण -  खेकडे केवळ तिवरे धरणावर आली का ? इतर धरणातही खेकडे आहेत, मग ती धरणे का फुटली नाहीत, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखर निकम यांनी जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली. तिवरे धरण खेकड्यांनी फोडले असे बालिश वक्तव्य जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, असेही श्री. निकम म्हणाले. खेकड्यांनी धरण फोडले, असे बालीश वक्तव्य करून जलसंधारणमंत्री नेमकी कुणाची पाठराखण करीत आहेत असा संतप्त सवालही त्यांनी केला. 

तिवरे धरण फुटून अनेक घरे उध्वस्त झाली, अनेक माणसांना आपला जीव गमवावा लागला, अनेक संसार उघड्यावर आली. हे धरण खेकड्यांनी फोडल्याचे वक्तव्य जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी केले. त्याचा मी निषेध करतो. खेकडे केवळ तिवरे धरणावर आली का ? इतर धरणातही खेकडे आहेत मग ते धरण का फुटले नाहीत. अशा प्रकारचे वक्तव्य एका मंत्र्याला शोभत नाही आपण या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो. या धरणाच्या गळतीबाबत वेळोवेळी निवेदने, अर्ज- विनंत्या करूनही अगदी जुजबी काम करून या सर्व विनंती अर्जाना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. जर वेळीच याची गंभीर दखल घेतली गेली असती तर आज अनेक कुटुंबे वाचली असती. त्यामुळे ही दुर्घटना प्रशासनाच्या गलथान कारभारामुळेच घडली आहे. उध्वस्त झालेले कुटुंब आणि मोठ्या प्रमाणावर झालेल्या जीवीतहानीस संबंधित ठेकेदारा, शासकीय अधिकारी आणि प्रशासन आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी त्यांनी केली. 

श्री. निकम म्हणाले, तिवरेतील आपदग्रस्तांना शासनाकडून तातडीची मदत देण्यात आली. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्‍यांनी अशा शासकीय कार्यक्रमात सहभागी होऊ लोकांची दिशाभूल करू नये. सावित्री नदीवरील दुर्घटनेत ज्यांचे नुकसान झाले त्यांना शासकीय मदत वगळता एसटीकडून प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यात आले. तिवरेतील आपदग्रस्तांना शासकीय मदत वगळता पाटबंधारे विभागाकडून वेगळी मिळाली पाहिजे. वाचलेल्यांपैकी प्रत्येक कुटूंबातील सदस्याला नोकरी मिळाली पाहिजे.

ग्रामपंचायतीपासून केंद्रापर्यंत शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना हे शक्य आहे. पाटबंधारे खात्याकडून वेगळी मदत जाहीर झाल्यास मी स्वतः त्यांचे अभिनंदन करीन असे श्री. निकम यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shekhar Nikam comment