esakal | गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांना शेंडे काव्य पुरस्कार 
sakal

बोलून बातमी शोधा

Shende Poem Award To Gazhalkar Madhusudhan Nanivadekar

हा पुरस्कार मधुसूदन नानिवडेकर यांच्या घरी प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, उपरणे आणि दहा हजार रुपये रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. 

गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांना शेंडे काव्य पुरस्कार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

तळेरे ( सिंधुदुर्ग) - कोकणात निरपेक्ष वृत्तीने साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरकडून विविध पुरस्कार दिले जातात. त्यातील यावर्षीचा द्वारकानाथ शेंडे विशेष काव्य पुरस्कार गझल या साहित्य प्रकारात निष्ठेने काम करणाऱ्या गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांना देताना आम्हाला अत्यानंद होत आहे, असे प्रतिपादन टिळक स्मारक वाचन मंदिराचे उपाध्यक्ष धनंजय चितळे यांनी केले. 

पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. प्रा. संदीप गोनबरे, निवेदक प्रसाद घाणेकर, जयलक्ष्मी नानिवडेकर, उज्वला धानजी, कवी प्रमोद कोयंडे, पत्रकार निकेत पावसकर, हेमंत देवस्थळी आदी उपस्थित होते. हा पुरस्कार मधुसूदन नानिवडेकर यांच्या घरी प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, उपरणे आणि दहा हजार रुपये रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. 

धनंजय चितळे म्हणाले, ""इतिहास आणि वर्तमान नीट ठेवताना भविष्य घडले पाहिजे. त्यासाठीच या पुरस्कारांची सुरुवात केली आहे. गझल हे मराठीमध्ये कमी रुजलेला साहित्य प्रकार आहे. त्यामध्ये नानिवडेकर निष्ठेने काम करीत आले आहेत. त्याची दखल घेऊन त्या कामाला एका पुरस्काराने अजून बळ मिळावे, यासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रस्ताव मागवले जात नाहीत, तर निरपेक्ष वृत्तीने हे पुरस्कार दिले जातात. 168 वर्षांची परंपरा असलेल्या चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरचे विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु असतात. यामध्ये अपरांत वस्तू संग्रहालय असून त्यामध्ये कोकणातील दोन हजार वर्षांपूर्वींच्या वस्तू आहेत. तर संपुर्ण कोकणातील 100 नामवंत व्यक्तींच्या तैल चित्रांचे कला दालन तयार केले आहे. त्यामुळे कोकणचा अभ्यास करायचा असेल तर लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला डावलून पुढे जाताच येणार नाही.'' 

यावेळी मधुसूदन नानिवडेकर यांनी विविध गझला सादर केल्या. कोकण मराठी साहित्य परिषद मालवण शाखेच्या सदस्या उज्वला धानजी यांनीही शाखेच्यावतीने स्वागत केले. नानिवडेकर यांनी टिळक स्मारक वाचन मंदिर आणि प्रकाश देशपांडे, अरूण इंगवले, राष्ट्रपाल सावंत, राठोड यांचे आभार मानले.