दिला इशारा मात्र जहाज समुद्रात : त्या जहाजाचा खर्च कोटीच्या घरात....

राजेश कळंबटे
सोमवार, 13 जुलै 2020

जहाजासंदर्भातील निर्णय लवकरात लवकर कळवावा अशा सुचना जहाजाच्या मालकाला देण्यात आल्या...

रत्नागिरी :  मिर्‍या किनार्‍यावर गेले सव्वा महिने अडकून पडलेल्या ‘बसरा स्टार’ जहाज लाटांच्या मार्‍यासह खडकांवर आपटून सुमारे वीस टक्केहून अधिक नुकसान झाले आहे. तळातील भागातून समुद्राचे पाणी जहाजात शिरले आहे. ते जहाज दुरुस्त करुन अत्याधुनिक तंत्राचा वापर करुन बाहेर काढण्यासाठीच येणारा खर्च कोटीच्या घरात जाण्याची शक्यता आहे. जहाजासंदर्भातील निर्णय लवकरात लवकर कळवावा अशा सुचना जहाजाच्या मालकाला बंदर विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

मिर्‍या येथील बंधार्‍याजवळ अडकून पडेलल्या जहाजातील ऑईल काढण्याचे आव्हान होते. भारत सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीचे तांत्रिक अधिकारी, जहाजाचा कॅप्टन, कर्मचारी यांनी जहाजामधून ऑईलची गळती होऊ नये यासाठी सात हजार लिटर ऑईल बाहेर काढले. त्यानंतर 25 हजार लिटर डिझेलही बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे इंधनाची गळती रोखली जाणार आहे. हे करत असताना अनेक धोके असतात; मात्र अनुचित न घडता ही प्रक्रिया पूर्ण झाली. जहाज बाहेर काढणे किंवा स्क्रॅब करणे याबाबतचा निर्णय संबंधित कंपनी तत्काळ घ्यावा अशा सुचना दिल्या आहेत. सध्या ते जहाज बाहेर काढणे शक्य असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा- घरकाम करीत असलेल्या महिलेच्या घरातील चारजण कोरोना पॉझीटिव्ह ;  मात्र संपर्कातील अधिकाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह -

समुद्र खवळलेला असल्यामुळे अजस्त्र लाटांच्या तडाख्यात सापडलेले जहाज खडकावर आपटल्याने मोठे नुकसान झाले आहे. जहाजाचा उजवा भाग सतत खडकावर आदळत असून तेथील तळ फुटलेला आहे. त्यातून पाणी जहाजात जात आहे. ही दुरुस्ती केल्याशिवाय जहाज काढणे अशक्य आहे. त्यासाठीचा खर्च काही लाख रुपयांमध्ये होऊ शकतो. वातावरण खराब असल्यामुळे सध्या हे काम करणे अशक्य आहे. जहाजाला बलून लावून त्याद्वारे ते ओढता येऊ शकते. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणाही लागणार आहे.

हेही वाचा-रवींद्र नागरेकर : प्रशासन काम चुकीचं करते, मग मंत्री कशाला...? -

दुरुस्तीसह जहाज काढण्याचाच खर्च एक कोटी रुपयांच्या घरात जाऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. या जहाजाची किंमत सुमारे दोन ते सव्वा दोन कोटी असावी असा अंदाज आहे. संबंधित जहाजाची कंपनी कोणता निर्णय घेणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, टगच्या सहाय्याने जहाज बाहेर काढण्याचा विचारही सुरु होता; परंतु अनेक ठिकाणी जहाजाचे नुकसान झाल्यामुळे ते बाहेर काढताना तळातून पाणी जाऊन बुडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा विचार सध्यातरी बाजूला ठेवण्यात आला आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ship 'Basra Star crashed more than 20 per cent damage mirya ashore inratnagiri