esakal | शिवसेना-भाजप वाद सिंधुदुर्गात गंभीर वळणावर 

बोलून बातमी शोधा

shiv sena-bjp dispute sindhudurg district}

परिणामी कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यानी दोन दंगल नियंत्रक पथके तैनात केली आहेत. जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली असून राजकीय हालचालींवर लक्ष ठेवून आहे. 

kokan
शिवसेना-भाजप वाद सिंधुदुर्गात गंभीर वळणावर 
sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - शिवसेना आणि भाजपमध्ये गेले काही दिवस सुरू असलेल्या वादाला आज गंभीर वळण लागले. शिवसेना खासदार विनायक राऊत व भाजप नेते माजी खासदार नीलेश राणे यांच्यातील शाब्दिक द्वंद्व आता रस्त्यावर सुरु झाले आहे. गेल्या दोन दिवसांत आपल्या नेत्याच्या समर्थनार्थ कार्यकर्ते विरोधी नेत्याचे प्रतिकात्मक पुतळा तयार करून जाळण्याचे आंदोलन शिवसेना व भाजपने केले. परिणामी कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यानी दोन दंगल नियंत्रक पथके तैनात केली आहेत. जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली असून राजकीय हालचालींवर लक्ष ठेवून आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या पडवे येथील मेडिकल कॉलेजच्या उद्‌घाटनास आले असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना यांच्यावर टीका केली होती. त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले. शिवसेना नेत्यांनी भाजप व शहा यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला चढविला. याच अनुषंगाने खासदार राऊत यांनी नारायण राणे याच्यावर टीका केली. यामुळे संतापलेल्या भाजप नेते तथा राणे पुत्र नीलेश यांनीही तिखट उत्तर दिले. 

ही टीका शिवसेनेच्या जिव्हारी लागली. त्यानंतर प्रथम आमदार वैभव नाईक यांनी "पुन्हा अशाप्रकारे राऊत यांना बोलाल तर शिवसैनिकच तुमचे थोबाड फोडतील' असा इशारा दिला होता. त्यानंतर कणकवली शिवसेनेने पोलिस ठाण्यात धाव घेत नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

त्याच दिवशी जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी पत्रकार परिषद घेत "वेळ आणि ठिकाण सांगा, शिवसैनिकच तुम्हाला उत्तर देतील,' असा गर्भित इशारा नीलेश राणे यांना दिला होता. इथपर्यंत हा वाद ठीक होता; परंतु, काल (ता.12) शिवसेनेने नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी लेखी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे केली; मात्र ही मागणी करण्यापूर्वी ओरोस फाटा येथे खासदार राऊत यांच्या संपर्क कार्यालयानजीक नीलेश राणे यांचा प्रतीकात्मक पुतळा तयार करून आंदोलन केले. 

यामुळे संतप्त भाजपने सुद्धा आक्रमक पवित्रा घेतला. सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब व भाजप कार्यकर्त्यांनी सावंतवाडी येथे खासदार राऊत यांचा पुतळा जाळला. ही बातमी समजताच सावंतवाडी शिवसेनेने तात्काळ सावंतवाडी पोलिस ठाणे गाठत संजू परब व अन्य कार्यकार्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. येथे आक्रमक झालेली शिवसेना थांबली नाही.

आज सकाळी पुन्हा शिवसेनेने सावंतवाडी पोलिस ठाणे गाठत संजू परब व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत न उठण्याचा पवित्रा घेतला; मात्र येथील पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी गुन्हे दाखल करता येत नाहीत; मात्र यापुढे असा प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेण्याचे आश्‍वासन दिल्याने शिवसैनिक माघारी परतले. याच दरम्यान कुडाळ भाजपने खासदार राऊत यांचे राहते घर असलेल्या मालवण तालुक्‍यातील तळगाव येथे जात त्यांचा पुतळा जाळला. कणकवली येथे दोन दंगल नियंत्रक पथके कार्यरत असताना कणकवली भाजपने येथील एसटी स्थानकाजवळ विनायक राऊत यांचा पुतळा जाळला. 

कणकवलीत बंदोबस्त 
या पार्श्‍वभूमीवर कणकवलीतील पटवर्धन चौक आणि बाजारपेठ परिसरात आज पोलिस बंदोबस्त तैनात होता. दंगल नियंत्रक पथकाचे पोलिसही सज्ज होते. जिल्ह्यात कणकवली शहर राजकीयदृष्ट्‌या संवेदनशील म्हणून ओळखले जाते. राजकीय तणावाचे पडसाद कणकवलीत उमटू नयेत, यादृष्टीने आज सकाळपासूनच शहरातील पटवर्धन चौक आणि बाजारपेठ भागात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्याही शहरात सज्ज आहेत. 

संपादन - राहुल पाटील