कोकण राणेमुक्त झाल्याने राणेकंपनी सैरभैर : कायंदे

सुचिता रहाटे
मंगळवार, 9 मे 2017

कोकण राणेमुक्त झाल्याने राणेकंपनी सैरभैर झाली आहे. त्यामुळे राणे पितापुत्र बाष्कळ विधाने करीत आहेत. त्यांच्या या विधानांकडे शिवसेना मुळीच लक्ष देत नाही. 

- मनीषा कायंदे, प्रवक्त्या, शिवसेना 

मुंबई : ''कोकण राणेमुक्त झाल्याने राणेकंपनी सैरभैर झाली आहे. त्यामुळे राणे पितापुत्र बाष्कळ विधाने करीत आहेत. त्यांच्या या विधानांकडे शिवसेना मुळीच लक्ष देत नाही,'' अशी कठोर टीका शिवसेना प्रवक्‍त्या मनीषा कायंदे यांनी 'सरकारनामा' शी बोलताना केली. 

काँग्रेस खासदार नीतेश राणे यांनी काल रात्री उशिरा आपल्या ट्‌विटर अकाउंटवरून शिवसेना विरोधात ट्‌विट केले. त्यात त्यांनी असे म्हटले आहे, की 'महाराष्ट्राचा शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, तसा महाराष्ट्र शिवसेना मुक्तही व्हायला हवा. रोजरोजची नौटंकी तरी बंद होईल.' याच विधानावर शिवसेना प्रवक्‍त्या मनीषा कायंदे यांनी 'राणेमुक्त कोकण' असा पलटवार केला. 

''नीतेश राणे बच्चा आहे. त्याने शिवसेना व ठाकरे कुटुंबीयांच्या वाटेला जाऊ नये. नारायण राणे हरल्याने तसाही कोकण मुक्त झालेला आहे. त्यात काँग्रेसची परिस्थिती बिकट आहे. असे असताना यांची शिवसेनेच्या नादाला लागायची हिम्मत कशी होते. नेहमीच राणेकंपनी शिवसेनेच्या तोंडाला लागून तोंडघशी पडते. नारायण राणे हे आजपर्यंत कोणत्याच पक्षाशी इमानदार राहिलेले नाहीत. त्यात त्यांना यश मिळत नसल्याने त्याचं हसं त्यांनीच करून घेतले आहे. जगापासून या राणेबंधूंची नौटंकी काही लपून राहिलेली नाही,'' असेही मनीषा कायंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील बित्तंबातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Web Title: Shiv Sena hits out at Narayan Rane