'बेडकाच्या नावाने उडवलेली टोपी राणेंनी स्वतःहून झेलली'

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

आमदार नीतेश राणे यांच्या टीकेचाही नाईक यांनी समाचार घेतला.

कणकवली - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आजवर चुकूनसुद्धा राणेंचा उल्लेख आपल्या वक्तव्यात केलेला नाही. दसरा मेळाव्यातही राणेंचा उल्लेख नव्हता. मात्र ‘एक बेडूक आणि त्याची दोन पोरं’ हे वर्णन आपलंच आहे असं समजून खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ही टीका करताना त्यांनी ठाकरेंचा एकेरी उल्लेख करून सभ्यतेचे सर्व संकेत पायदळी तुडवले आहेत, असा आरोप शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आज येथे केले.
 

पुढे बोलताना आमदार नाईक म्हणाले, दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्र्यांनी बेडकांच्या नावाने उडवलेली टोपी राणेंनी स्वतःहून झेलली आणि आपल्या डोक्यावर घालून घेतली. आता राणे स्वतःलाच बेडूक समजायला लागले तर त्यावर आपण तरी काय बोलणार? त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात नारायण राणेंच्या बाबतीत बेडूक हे नवीन विशेषण प्रचलित होईल. त्यांचे सध्याचे वागणे देखील या विशेषणला शोभेसेच असल्याचे त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्येही दिसून आले.
 बेडूक हे विशेषण ऐकल्यावर नारायण राणेंच्या अंगाचा तिळपापड झाला. त्यामुळे पत्रकार परिषदेत आपण कुणाविषयी काय बोलत आहोत याचेही किमान भान त्यांना राहिले नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाला यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शरदराव पवारांपर्यंत सुसंस्कृत विरोधी नेत्यांची परंपरा आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते सभ्यतेचे काही अलिखित संकेत पाळतात. राणेंनी मात्र मुख्यमंत्री पदावर विराजमान असलेल्या उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करून सभ्यतेचे अलिखित संकेत पायदळी तुडवले आहेत. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसून सुद्धा राणेंना त्या खुर्चीचे पावित्र्य, प्रतिष्ठा आणि पत कधी समजलीच नाही. 

आमदार नीतेश राणे यांच्या टीकेचाही नाईक यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, दुसर्‍यांना संस्कार शिकविणार्‍या नीतेश राणेंनी आधी स्वतःवर संस्कार झालेत का? हे तपासून पहायला हवे. चिंटू शेखवर गोळीबार, हॉटेल व्यावसायिक हितेश केसवाणीकडून खंडणी, गोव्यात टोल नाक्यावर तोडफोड, होंडा शोरुम जाळून टाकण्याचे, सरकारी अधिकार्‍यांवर बांगडाफेक आणि चिखलफेक करण्याचे संस्कार नारायण राणेंनीच केले होते का? नीलेश राणेंनी ज्या अमानुष पद्धतीने संदीप सावंत या स्वतःच्याच कार्यकर्त्याला मारहाण केली ते संस्कार नारायण राणेंनीच आपल्या मुलावर केले होते का? याचेही उत्तर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यायला हवे. फक्त संस्कारांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जगातील दोन असंस्कृत, असभ्य आणि असंस्कारक्षम मुलांचे नारायण राणे हे पिता आहेत, असेच खेदाने म्हणावे लागेल.

हे पण वाचादसऱ्याचे नव्हे शिमग्याचे भाषण ; चंद्रकांत पाटीलांकडून मुख्यमंत्र्यांची खिल्ली

गांजा शेतीबाबत मोठ्या भावाला विचारा 
मातोश्रीच्या अंगणात तुळशी वृंदावनच आहे. मात्र गांजाची शेती कुणाच्या अंगणात पिकते याची विचारणा नीतेश राणेंनी आपल्या मोठ्या भावाकडे करावी. त्वरित त्याचा उलगडा होईल, असा टोला नाईक यांनी लगावला.

हे पण वाचासरकार मराठा आरक्षण प्रश्‍नापासून पळ काढते

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena MLA Vaibhav Naik criticism on narayan rane