
नारायण राणे तुम्ही मातोश्रीवर तीन तीन वेळा का फोन करत होता ?
कणकवली (सिंधुदुर्ग) : नारायण राणेच्या मेडिकल कॉलेजला देवेंद्र फडणवीसांनी नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंजूरी दिली.राणे मातोश्रीवर दिवसाला दोन तीन वेळा फोन करून मंजूरीसाठी प्रयत्न करीत होते. मी आज ते कणकवलीच्या जनतेसमोर उघडपणे सांगत आहे. आम्ही जनतेच्या विकासाच्या आड येणार नाही. हे जर खोटं असेल तर राणेंनी आपल्या आई - वडिलांची शपथ घेऊन सांगावे. सत्य काय आहे ते असे खुले आव्हान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी रविवारी पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात केले.
कणकवलीत रविवारी शिवसेना मध्यवर्ती जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह जिल्हातील शिवसेनेचे पदाधिकाही होते. कार्यक्रमात बोलताना राऊत यांनी राणे कुटुंबावर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले, कणकवलीकरांन समोर मी आता उघड करू का ? पत्रकारांच्या समोर सांगतोय जा त्या नारायण राणे यांना विचारा की दोन महिन्यांपूर्वी तुम्ही मातोश्रीवर फोन किती वेळा केले होते. कशाला फोन करता होता मोतोश्रीवर ? उद्धव ठाकरे यांच्याशी बोलायचं आहे असे म्हणत दिवसाला तीन तीन फोन केले. खोटं असेल तर आई बाबांची शपथ घेऊन सांगा. मी सांगतो हे खरं आहे. देवेन्द्र फडणवीस यांनी राणेंना अखेर पर्यत कॉलेज दिल नाही. नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली.
देवेन्द्र फडणवीस यांच्या आश्रयाला जाऊन सुद्धा राणेंना कॉलेज मिळाले नाही, एक वर्षांपूर्वीच नारायण राणे यांचे कट्टर राणे समर्थक असलेले सतीश सावंत यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर राणे यांचा तीळपापड होत आहे, असे सांगून राऊत म्हणाले, तोच राग ठेवत सतीश सावंत यांची संचयनी घोटाळा प्रकरणी तक्रार करण्यासाठी राणे अनुराग ठाकूर यांच्याकडे दिल्लीला जाणार आहेत. आम्हाला माहिती नाही का की नितेश राणेंनी नवी मुंबईच्या म्हात्रे नावाच्या इसमाला 12 कोटींचा गंडा नवी मुंबईमध्ये घातला तो ? चिपळूणच्या संदीप सावंत यांना गाडीमध्ये घालून कसे मारत- मारत नेलं ? अशोक राणेंचा खून कोणी केला हे आम्हाला माहिती आहे . मनचेकर यांच डोकं कोणी फोडलं सगळी कुंडली आहे. खुशाल दिल्लीमध्ये जावा. या 12 कोटींच्या केसमध्ये त्यावेळी नितेश राणे यांना देवेन्द्र फडणवीस तुरुंगात टाकणार होते. त्यांचे वडील शरण गेले भाजपला म्हणून ती केस थांबली.
चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरुनही राऊत यांनी राणेंवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, नारायण राणे त्या दृष्टीने खूप कच्चे आहेत. विमानतळ सुरू करण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात हे नारायण राणे यांना कधीच कळणार नाही. त्यांनी ते शिकून सुद्धा घेऊ नये. त्यांच्या ते अवाक्याच्या पलीकडे होते ते. म्हणून तर ते मला काम पूर्ण करावं लागले. त्यामुळे राणे यांच्या बोलण्याला मी किंमत देत नाही चिपी विमानतळ साठी विनायक राऊत यांनी किती प्रयत्न केलेत हे जाणून घ्यायचं असेल तर भारतीय जनता पक्षाचे पंचवीस वेळा खासदार राहिलेले राजीव प्रताप रुडी आहेत त्यांच्याकडे राणेंनी बसावं मग सगळ्या गोष्टी समजतील.
संपादन- अर्चना बनगे