esakal | शिवसेनेने भरली `या` 200 ग्रामस्थांची वीजबिले 
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena Pays Electricity Bills Of 200 Economically Backward Villagers

कोरोना काळातही समाजसेवेत शिवसेना अग्रेसर असताना विरोधक टीका करीत आहेत. मात्र, अशा दळभद्री टीका करणाऱ्या राजकारण्यांना न जुमानता शिवसैनिकांनी आपले काम आणि कार्य सुरू ठेवावे, असे आवाहनही खासदार राऊत यांनी या वेळी केले.

शिवसेनेने भरली `या` 200 ग्रामस्थांची वीजबिले 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग) - राज्यात भरमसाट काढण्यात आलेल्या वीजबिलाबाबत योग्य तोडगा काढा, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांकडून ऊर्जामंत्र्यांना दिलेले आहेत. असे असताना जर एखाद्याची वीज तोडल्यास ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी काल (ता. 12) येथे दिला. 

कोरोना काळातही समाजसेवेत शिवसेना अग्रेसर असताना विरोधक टीका करीत आहेत. मात्र, अशा दळभद्री टीका करणाऱ्या राजकारण्यांना न जुमानता शिवसैनिकांनी आपले काम आणि कार्य सुरू ठेवावे, असे आवाहनही खासदार राऊत यांनी या वेळी केले. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब आणि तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या माध्यमातून तालुक्‍यातील दारिद्य्ररेषेखालील 200 ग्रामस्थांची वीजबिले भरण्यात आली. हा कार्यक्रम काल मळगाव येथील हॉटेल शालूमध्ये पार पडला. या वेळी खासदार राऊत बोलत होते. 

या वेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत, रूची राऊत, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, विकास कुडाळकर, ग्राहक संरक्षण मंचाचे भरत पंडित, महिला तालुका संघटक अपर्णा कोठावळे, रश्‍मी माळवदे, सुशील चिंदरकर, महेश शिरोडकर, विनोद काजरेकर, सुनील गावडे, अनिल जाधव, संजय माजगावकर, योगेश नाईक, गुणाजी गावडे आदी उपस्थित होते. 

श्री. राऊत म्हणाले, ""वीजबिल भरणा करण्याचे आश्‍वासन देऊन याठिकाणी कोणाला बोलावण्यात आले नाही; तर वीजबिल भरणा केल्यावर या ठिकाणी संबंधितांना बोलावण्यात आले आहे. कर्तव्य भावनेतून ही मदत केली. संपूर्ण राज्यात वीजबिलाबाबत सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले असून, मुख्यमंत्र्यांची ऊर्जामंत्र्यांसह बैठक झाली. या बैठकीत याबाबत तोडगा काढण्याचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.'' 

खासदार राऊत म्हणाले, ""जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेत अपुरे कर्मचारी असतानाही जिल्ह्याचे आरोग्य चांगले राखण्याचे काम यंत्रणा पार पाडत आहे. आरोग्य कर्मचारी हे जिल्ह्याचे वैभव असून, श्री. सावंत यांनी आशा सेविकांचा गौरव केला. त्याचा शिवसेनेला अभिमान आहे. आपण केलेल्या विनंतीला तुमच्या चाकरमान्यांनी मान दिला व कोकणात न येता मुंबईतच यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतल्यास सर्व चाकरमान्यांचे आपण अभिनंदन करतो आणि समजूतदारपणा असलेले चाकरमानी कोकणात मिळतील. त्यामुळे सर्व नियमांचे पालन करून यावर्षी गणरायाची सेवा करूया.'' 

शैलेश परब म्हणाले, ""शिवसेना एक कुटुंब असून, जिल्ह्यात जेथे कोणावर अन्याय होईल, तेथे शिवसेना उभी राहील. एकीकडे कोरोनाचे संकट, तर दुसरीकडे आर्थिक संकट अशा विवंचनेत सापडलेल्या येथील सर्वसामान्य जनतेसमोर भरमसाट आलेल्या वीजबिलाचा प्रश्न आ वासून उभा होता. गणेशोत्सव सणाच्या तोंडावर त्यांची वीजबिले भरताना झालेला आनंद खूप मोठा आहे. प्रत्येक शिवसैनिकाने ताकदीने जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करावे.'' 

विक्रांत सावंत यांनी शैलेश परब, रूपेश राऊळ व जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केलेल्या चांगल्या उपक्रमाचे कौतुक करीत शिवसेनेच्या 80 टक्‍के समाजकारण व 20 टक्‍के राजकारण हा संदेश सर्वांपर्यंत पोचविल्यात आल्याचे सांगितले. विकास कुडाळकर यांनीही मार्गदर्शन केले.