रवींद्र नागरेकर : प्रशासन काम चुकीचं करते, मग मंत्री कशाला...? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जुलै 2020

 मंत्र्यांचा, आमदार, खासदारांचा काय फायदा? हे नेते लोकांसाठी आहेत की, पक्षाच्या प्रमुखांना खुश करण्यासाठी... 

राजापूर (रत्नागिरी) : चक्रीवादळामुळे दापोली-मंडणगड भागात लोकांचे भयंकर नुकसान झाले. पंचनामे खोटे केले गेले. ज्याचे नुकसान नाही, त्याला मदत दिली गेली. ज्याचे 10 हजाराचे नुकसान त्याला दीड लाख दिले. सरकारची तुटपुंजी मदत लोकांपर्यंत पोहचली नाही. मंत्री असून प्रशासन काम चुकीचं करत असेल, तर अशा मंत्र्यांचा, आमदार, खासदारांचा काय फायदा? हे नेते लोकांसाठी आहेत की, पक्षाच्या प्रमुखांना खुश करण्यासाठी आहेत, अशा शब्दात भाजपाचे रवींद्र नागरेकर यांनी जिल्ह्यातील शिवसेना लोकप्रतिनिधींवर टीकास्त्र सोडले आहे. 

हेही वाचा-किती निष्काळजीपणा! पुरातून जाणे आले अंगलट -

रवींद्र नागरेकर; शिवसेना लोकप्रतिनिधींवर टीकास्त्र ​

कोरोनामुळे मजुरदार, कारागीर, शेतकरी घरी आहेत. केंद्रांनी केलेला धान्यपुरवठा फक्त अंत्योदय, दारिद्रयरेषेखालील लोकांना नियमित धान्य व मोफत धान्य दिले जात आहे, एपीएल लोकांना एकदाच 12 रुपये तांदूळ, 8 रुपये गहू फक्त 75 टक्के दिला गेला. डाळ गोदामामध्ये पडून आहे. मागणी आणि पुरवठा यांचा मेळ नाही, असे असताना याकडे या नेत्यांचे दुर्लक्ष आहे. वीजबिले भरमसाठ आली. तीन महिने घरी बसलेल्या लोकांनी ही बिलं भरायची कशी? तुम्ही खात्याचे मंत्री, तुमचे मुख्यमंत्री, मग कोकणच्या जनतेसाठी आवाज का नाही काढत. जिल्ह्याचे लॉकडाउन करताना प्रशासन आणि आपला आमदार यांचा समन्वय का नाही? काही तालुक्‍यात दुकाने उघडी, काही तालुक्‍यात बंद, बाजारातून गर्दी, मात्र भाविकांची मंदिरे बंद हा भेदभाव का? असा प्रश्‍न त्यांनी केला. 

हेही वाचा- बापरे! अनेक घरे धोक्याच्या छायेत, कुठे अन् कशामुळे? -

तिवरे घटना, सेनेचे ते आमदार जबाबदार 
चिपळूण-तिवरे गावात गेल्या पावसात मोठी दुर्घटना घडली. तेथील त्या वेळचे सेनेचे आमदार जबाबदार होते. अजून कार्यवाही नाही. त्या लोकांच्या समस्या कोण सोडवणार? आपणच आश्वासने दिली होती ना? असा सवाल नागरेकर यांनी केला. 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On Shiv Sena people's representative comments for Ravindra Narvekar in ratnagiri