esakal | छत्रपती शिवरायांचा किल्ले सिंधुदुर्गवर जयघोष 
sakal

बोलून बातमी शोधा

shivjayanti konkan sindhudurg

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्‍वर मंदिरातील शिवरायांची मूर्ती आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली होती. शिवजयंतीनिमित्त राज्यभरातील अनेक शिवभक्तांची रेलचेल सुरू होती. 

छत्रपती शिवरायांचा किल्ले सिंधुदुर्गवर जयघोष 

sakal_logo
By
प्रशांत हिंदळेकर

मालवण (सिंधुदुर्ग) - छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, अशा घोषणा देत तालुका शिवसेनेतर्फे आज किल्ले सिंधुदुर्गवर शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवराजेश्‍वर मंदिरात शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी जिरेटोप, पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. 

तालुका शिवसेनेतर्फे किल्ले सिंधुदुर्गवर शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी समुद्रात मालवण बंदर जेटी ते किल्ले सिंधुदुर्ग अशी ढोल-ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्‍वर मंदिरातील शिवरायांची मूर्ती आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली होती. शिवजयंतीनिमित्त राज्यभरातील अनेक शिवभक्तांची रेलचेल सुरू होती. 

किल्ल्यातील पुजारी श्रीराम सकपाळ, सयाजी सकपाळ, सचिन लोके, हितेश वायंगणकर, सादिक शेख यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, विजय पालव, सेजल परब, दीपा शिंदे, पूनम चव्हाण, श्‍वेता सावंत, दर्शना कासवकर, तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, शिल्पा खोत, भाई कासवकर सन्मेष परब, कमलाकर गावडे, यशवंत गावकर, अमित भोगले, राहुल सावंत, पॉली गिरकर, देवा रेवडेकर, दर्शन म्हाडगुत, महेंद्र म्हाडगूत, उमेश मांजरेकर, पंकज सादये, अमोल वस्त, भाऊ परब, राजू नार्वेकर, किल्ले होडी प्रवाशी संघटनेचे स्वप्नील आचरेकर, मंगेश सावंत, राजू पराडकर, बाळा तारी उपस्थित होते. 

अनेक वर्षे सिंधुदुर्ग किल्ल्यावर येणाऱ्या शिवप्रेमींना व किल्ला रहिवाशांना पाण्याचा प्रश्‍न भेडसावतो. पर्यटकांनाही पाण्याची गैरसोय होते. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किल्ल्यावरील नळपाणी योजनेसाठी पाच कोटी रुपये मंजूर केले असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले. शिवराजेश्वर मंदिरातील दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असून किल्ल्यावरील साफसफाई व इतर कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे आश्‍वासन त्यांनी दिले. 

मुख्यमंत्र्यांनी शिवभक्तांना रोखले नाही! 
राज्यात शिवजयंती उत्सव करण्यास शासनाने किंवा मुख्यमंत्र्यांनी कोणाही शिवभक्तांना रोखले नव्हते. केवळ कोरोना प्रादुर्भावामुळे नियम व अटी शर्थीचे पालन करून शिवजयंती उत्सव साजरा व्हावा, अशी शासनाची विनंती होती; मात्र माजी खासदार नीलेश राणे यांनी आपण शिवजयंती थाटात साजरी करणार, कोणीही रोखा असा इशारा देत केवळ स्टंटबाजी केली, असा आरोप या वेळी आमदार नाईक यांनी केला. 

संपादन - राहुल पाटील